esakal | wari 2019 : वारीत नामस्मरणाच्या भक्तिसागराची जादू 
sakal

बोलून बातमी शोधा

wari  2019 : वारीत नामस्मरणाच्या भक्तिसागराची जादू 

आनंद काय असतो, तो वारीतून शिकण्यासाठी यंदा प्रथमच वारीत आले आहे. घरी, गावात वारीची पंरपरा आहे, मात्र आपण त्यात सहभागी झालो नाही, याची खंत होती. वारीची मनीषा या वर्षी पूर्ण केली,'' असे सायलीने  सांगितले. 

wari 2019 : वारीत नामस्मरणाच्या भक्तिसागराची जादू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंडवडी - ऊन-सावलीसह पावसाच्या धारा अंगावर घेत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या नामस्मरणात पंढरीच्या वाटचालीतील रोटी घाटातील अत्यंत बिकट वाट संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पार केली. घाट चढताना वरुणराजाने लावलेल्या हजेरीमुळे आबालवृद्ध वारकरी मनस्वी आनंदला. त्याच आनंदात देहू (जि. पुणे) येथील सायली जाधव हीसुद्धा सहभागी झाली होती. ""आनंद काय असतो, तो वारीतून शिकण्यासाठी यंदा प्रथमच वारीत आले आहे. घरी, गावात वारीची पंरपरा आहे, मात्र आपण त्यात सहभागी झालो नाही, याची खंत होती. वारीची मनीषा या वर्षी पूर्ण केली,'' असे सायलीने  सांगितले. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंडहून उंडवडीला मार्गस्थ झाला. पावसाळी वातावरण तर होतेच, मात्र आजच्या वाटचालीत त्यांना रोटी घाटाची मोठी बिकट वाट पार करायची होती. पालखी सोहळा भागवस्ती, पाटसला मुक्कामी होता. त्याचवेळी दिंड्या व वारकरी हळूहळू रोटी घाटाकडे वळत होते. काही वारकरी 

सोहळा पाहण्यासाठी टेकाडावरही बसले होते. सोहळा रोटी घाटात येताच, विठुरायाच्या नामघोषास सुरवात झाली. घाटाखालीच रोटी गावातील सहा बैलजोड्या पाखलीला जोडल्या. तेथून रथ ओढून वर नेण्यात आला. घाट पार झाल्यावर रोटीतर्फे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर अभंग आरती झाली. आरती होताच, पावसाच्या हलक्‍या सरी आल्या अन्‌ वारकरी आंनदात नाचू लागले. 

वेगवेगळे खेळ करू लागले. फुगडी, झिम्मा, अभंग, मृदंगाच्या जणू स्पर्धाच लागल्या. त्यात हातात झेंडा घेतलेल्या सायलीने लक्ष वेधले. ती तल्लीन होऊन अभंग म्हणत होती. 

सायली जाधव देहू गावची. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिची यंदा पहिली वारी आहे. त्यामुळे ती आनंदी होती. वारी म्हणजे आनंदसोहळा आहे, याची जाणीव सोहळ्यात सहभागी झाल्यावर आली, असे सायलीने सांगितले. ती म्हणाली, ""वारीची परंपार गावात आहे, घरात आहे. नामस्मरणाच्या भक्तिसागरात नेमकी काय जादू आहे, ते शिकण्यासाठी वारी आले  आहे.'' 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वारीत बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. संयम ही महत्त्वाची गोष्ट येथे शिकता आली. सन्मानाची परंपरा चांगली आहे. अशा वेगवेगळ्या परंपरा जोपासताना त्याचा रोजच्या जीवनात कसा उपोयग करून घेता येईल, याचा प्रयत्न करण्याची इच्छा आहे. 
सायली जाधव, युवा वारकरी