wari 2019 : सोपानदेव यांच्या पालखीचे मांडकीत स्वागत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

 संत सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा वीर, लपतळवाडी या गावांमध्ये स्वागत स्वीकारीत मांडकी (ता. पुरंदर) येथे दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला.

वाल्हे - संत सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा वीर, लपतळवाडी या गावांमध्ये स्वागत स्वीकारीत मांडकी (ता. पुरंदर) येथे दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला. टाळमृदंगात जयघोष आणि हजारो भाविकांची दर्शनासाठी उडालेली झुंबड यामुळे अवघी मांडकी दुमदुमली होती. आज सकाळी पांगारे येथून निघालेला पालखी सोहळा धीम्या गतीने परिंचेमध्ये न्याहरी घेऊन वीर-लपतळवाडी या ठिकाणी विसावला.

लपतळवाडी येथे सरपंच वैशाली पिलाणे, उपसरपंच महादेव पिलाणे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामसेवक संदीप भंडलकर, महेश जाधव, सुरेखा शेरे, अलका कदम, नितीन पिलाणे, दादा मोरे, चंद्रकांत पिलाणे, शिवाजी कदम आदी उपस्थित होते. अल्पशा विश्रांतीनंतर निघालेल्या पालखी सोहळ्याचे सायंकाळी साडेसहा वाजता पावसाच्या हलक्‍या सरींच्या वर्षावामध्ये मांडकी येथे मोठ्या उत्साहात आगमन झाले. ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. पारंपरिक ढोल-लेझीमच्या तालावर मांडकी येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचा खेळ करीत पालखी सोहळ्याचे सोमेश्‍वरचे संचालक मोहन जगताप, सरपंच सतीश जगताप, ज्ञानेश्‍वर शिंदे, विजय साळुंखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा प्रमुख विश्‍वस्त गोपाळ गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विश्वास जगताप, पोलिस पाटील प्रवीण जगताप, तेजपाल सणस, मानसिंग जगताप, महेश साळुंके आदी उपस्थित होते. या वेळी गावातील घरांसमोर रांगोळीच्या पायघड्या अंथरून घरांवर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sopan Dev palkhi in mandki