esakal | Wari 2019 : आता आस पाऊस आणि विठ्ठलाच्या भेटीची
sakal

बोलून बातमी शोधा

Mahendra-Mhaske

पुरंदावडे येथे आज गोल रिंगण 
बरडहून निरोप घेऊन सकाळी माउलींची पालखी नातेपुत्याकडे मार्गस्थ झाली. धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वागत केले. सायंकाळी सोहळा नातेपुते मुक्कामी विसावला. उद्या रविवारी सकाळी सदाशिवनगरजवळील पुरंदावडे येथे माउलींच्या सोहळ्यातील गोल रिंगण होणार आहे.

Wari 2019 : आता आस पाऊस आणि विठ्ठलाच्या भेटीची

sakal_logo
By
विलास काटे

नातेपुते - वारीच्या वाटचालीत आज पाऊस झाला. गावाकडेही पाऊस सुरू आहे. मात्र, पेरण्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी दीर्घकालीन पावसाची आणि सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर समीप आल्याने विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे, अशी भावना यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे महेंद्र म्हस्के यांनी व्यक्त केली.

बारावीपर्यंत शिक्षण झालेले म्हस्के यांनी वारकरी संप्रदायातील वाङ्‌मयाचा अभ्यास केला आहे. कुटुंबाची पंरपरा जपत तेही वारीत सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, ‘आजच्या वाटचालीत सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी अकरापर्यंतचा प्रवास सुखकर होता. दुपारी जेवण झाल्यानंतर कधी पाऊस तर कधी ऊन अशा नैसर्गिक बदलाचा अनुभव वारकऱ्यांना आला.’

सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरीत पालखीने प्रवेश केला आणि पंढरपूर समीप आल्याने विठुरायाच्या दर्शनाची ओढ म्हस्के यांच्याप्रमाणे सर्व वारकऱ्यांना वाटू लागली. ‘वारीत चालताना भेदरहित समाजाचे दर्शन झाले. जात नाही, पंथ नाही... प्रत्येक जण माउलींच्या सोबत चालताना आनंदी आहे. विठ्ठल भेटीच्या ध्येयाने सर्व जण पुढे चालत आहेत. जगाच्या पाठीवर असा अलौकिक सोहळा नाही. म्हणूनच वारकरी परंपरा आणि साहित्य फक्त टिकवणेच नाही तर पुढच्या पिढीकडे सोपविणे आवश्‍यक आहे. यातूनच जगात शांतता, समता, एकता, बंधुता टिकून राहणार आहे. वारकरी सांप्रदायाचे पाईक होऊन शांततामय जीवन कसे जगायचे, हे मला वारीत शिकायला मिळाले,’ असे म्हस्के 
यांनी सांगितले.