β कॉंग्रेस कल्चरचे कार्यकर्ते भाजपात टिकणार?

β कॉंग्रेस कल्चरचे कार्यकर्ते भाजपात टिकणार?
β कॉंग्रेस कल्चरचे कार्यकर्ते भाजपात टिकणार?

भाजपमध्येही हौशे, गवसे, नवसे
भाजपचा झेंडा आज खांद्यावर घेऊन जय म्हणणारे आयाराम पुढील निवडणुकीत कोणाचा जय म्हणतील हे सांगता येत नाही. कॉंग्रेस कल्चरमध्ये वाढलेले कार्यकर्ते भाजप कल्चरमध्ये टिकतात का? की पुढचा जय कोणाचा म्हणतात याची प्रतीक्षा आता पुढील निवडणुकीपर्यंत करावी लागणार आहे.

मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांसाठी रणांगण सज्ज झाले आहे. "कोणाला पाडायचे, कोणाला विजयी करायचे‘ हे मतदार ठरविणार आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना यावेळी वेगळे महत्त्व आहे. मैदान मारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शड्डू ठोकून तयार आहेत. त्यांच्याप्रमाणे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर पक्षही मैदानात उतरणार आहेतच. निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता "आयाराम-गयाराम‘ना ही महत्त्व आले आहे. सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या कार्यकर्त्यांच्या छबी वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत. न पाहिलेले चेहरेही पुढे येत आहेत. हे चित्र प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतेच. त्यामध्ये विशेष असे काही नाही. आज जे कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत ते उद्या भाजप किंवा शिवसेनेतच असतील हे काही सांगता येत नाही. "जिकडं गुलाल खोबरं, तिकडं चांगभलं‘ म्हणणाऱ्यांचीही काही कमी नाही. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचा सर्वाधिक ओढा भाजपकडे असल्याचे काहीसे चित्र राज्यात दिसत आहे. "आयाराम‘ना प्रवेश देताना सर्वांत मोठी अडचण झाली आहे. ती मात्र भाजपचीच. यापूर्वी या पक्षाकडे जाणारे कार्यकर्ते तुलनेने कमी होते. पण, सत्ता आली की हे चित्र बदलते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भाजपचे जे मूळ किंवा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते पक्ष कधीच सोडत नाही. पक्षावर कितीही संकट येऊ द्या ते डगमगत नाहीत. पक्षाच्या यशात लाखो कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पक्षासाठी त्याग करणारे असे अनेक नेते, कार्यकर्ते आहेत की ते आजही पडद्यामागे आहेत. मात्र चमकेशांचीच चलती आहे.
आज देशात आणि राज्यातही या पक्षाचे सरकार असल्याने इतर पक्षातील कार्यकर्ते पुन्हा कोलांटउड्या मारत आहेत. ज्यांनी एकेकाळी भाजपविषयी मुक्ताफळे उधळली तेच आज पक्षाचे सदस्य होत आहेत हे चित्र पाहताना निष्ठावंतांची मात्र कोंडी होण्याबरोबरच पक्षाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होताना दिसत आहे. ते सोशल मिडियावर प्रतिक्रिया देत आहेत. या भावना अगदी योग्य असल्या तरी एक पक्ष म्हणून भाजप कोणाला रोखताना दिसत नाही. अगदी गावावरून ओवाळून टाकलेल्या कार्यकर्त्यांनाही पक्षात वाजतगाजत प्रवेश देण्यात आले आहेत. तशी अनेक उदाहरणेही देता येतील. आज तर हौशे, गवसे, नवसे पक्षात आले आहेत. ज्यांची प्रतिमा मलीन आहे अशा कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना निष्ठावंतांना काय वाटत असेल हाही प्रश्‍न आहे, मात्र पक्ष नेतृत्वाला त्याचे काहीही देणे नाही. फक्त निवडणूक जिंकणे हेच ध्येय (कॉंग्रेसप्रमाणे) असल्याने हे होतच राहणार.

पक्ष वाढीसाठी शेवटी सर्वांनाच सामावून घ्यावे लागत असले तरी भाजपत प्रवेश केला की तो गंगेत स्नान करून शुद्ध होतो तसे चित्रही निर्माण केले जात आहे. आज भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन जय म्हणणारे हे उपरे पुढील निवडणुकीत कोणाचा जय म्हणतील हे सांगता येत नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ते भाजप असा प्रवास केलेले कार्यकर्त्यांचाच पक्षात भरणा आहे. तसेच चित्र यापूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना पाहण्यास मिळाले होते. अनेक साखरसम्राट शिवसेनेत होते. शिवसेना प्रमुखांच्या उपस्थित प्रवेश केलेले फोटो तर नेहमीच प्रसिद्ध होत असतं. त्यावेळी शिवसेनेत गेलेले नेते आज कुठे आहेत याचाही शोध घ्यायला हवा. एक उदाहरण द्यायचे तर विखे पाटील कुठे कुठे होते, आणि आज कुठे आहेत? कॉंग्रेस कल्चरमध्ये वाढलेले कार्यकर्ते भाजप कल्चरमध्ये टिकतात का? की पुढचा जय कोणाचा म्हणतात याची प्रतीक्षा आता पुढील निवडणुकीपर्यंत करावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com