
देहूतून २० जून रोजी प्रस्थान
देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २० जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे व इतर उपस्थित होते. पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ः पालखी सोहळ्याचे २० जून रोजी देहूतून प्रस्थान होईल. प्रस्थानानंतर सोहळा देहूतील इनामदारवाड्यात मुक्कामी असेल. २१ जून रोजी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी जाणार आहे. २२ रोजी पिंपरी एच. ए. मैदान, कासारवाडी, शिवाजीनगरमार्गे पुण्यातील नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन दिवसांसाठी मुक्कामी जाईल. २४ रोजी सोहळा हडपसरमार्गे लोणीकाळभोरमध्ये मुक्काम करेल. २५ रोजी यवत येथे तर २६ रोजी सोहळा वरवंड मुक्कामी राहील.
२७ रोजी सोहळा उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामी जाणार आहे. २८ रोजी बारामती येथे मुक्कामी असेल. २९ रोजी सोहळा बारामतीतून सणसर मुक्कामी जाईल. ३० रोजी सणसरमार्गे सोहळा बेलवंडीत पोचेल. बेलवंडी येथे सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होईल. १ जुलै रोजी शेळगाव फाटा, गोतंडी मार्गे सोहळा निमगाव केतकी तर २ रोजी इंदापूरला मुक्कामी जाईल. इंदापूर येथे गोल रिंगण होईल. ३ रोजी सोहळा इंदापुरातच मुक्कामी असेल. ४ रोजी सोहळा गोकुळीचा ओढा, बावडा मार्गे सराटी येथे तर ५ रोजी सोहळा अकलूज मुक्कामी जाईल. तेथे तिसरे गोल रिंगण होईल. ६ जुलै रोजी माळीनगरमध्ये पहिले उभे रिंगण करून सोहळा बोरगाव मुक्कामी जाईल. ७ रोजी बोरगावहून निघून दुपारी तोंडले बोंडले येथे धावा होईल. त्यानंतर सोहळा पिराची कुरोलीत मुक्कामी असेल. ८ रोजी सोहळा बाघडवस्ती, भंडी शेगावमार्गे बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर वाखरीत मुक्कामी असेल. ९ रोजी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. १० जुलै रोजी आषाढी वारीची परंपरागत नगरप्रदिक्षणा होईल. त्यानंतर सोहळा पंढरपूर मुक्कामी राहणार आहे. १३ जुलै रोजी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होईल, अशी माहिती संतोष महाराज मोरे यांनी दिली.
अशी होतील रिंगणे
पहिले गोल रिंगण ः ३० जून रोजी बेलवंडी
दुसरे गोल रिंगण ः २ जुलै रोजी इंदापूर
तिसरे गोल रिंगण ः ५ जुलै रोजी अकलूज
पहिले उभे रिंगण ः ६ जुलै माळीनगर
दुसरे उभे रिंगण ः ८ जुलै वाखरी
तिसरे गोल रिंगण ः ९ जुलै इसबावी
धावा ः ७ जुलै रोजी तोंडले- बोंडले
Web Title: देहूतून २० जून रोजी
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..