
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, आजच करा अर्ज, दरवर्षी मिळवा ६ हजार रुपये! जाणून घ्या, कागदपत्रे व अर्ज करायची पद्धत
PM Kisan Yojana : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. त्यासाठी तहसील कार्यालयातून अर्ज करणे खूप सोयीचे असून जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी व राज्यात कृषी आयुक्तांकडून मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ योजनेचा लाभ सुरु होतो.
राज्यातील एक कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे सहा हजार रुपये ‘पीएम किसान सन्मान’ योजनेतून मिळतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन नावावर असणे आवश्यक आहे.
त्यानंतर जमिनी घेतलेल्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. दरम्यान, अनेकांना सन्मान निधी योजनेची माहिती नव्हती. त्यामुळे अनेकांनी विलंबाने अर्ज केले, अजूनही काहीजण अर्ज करीत आहेत.
बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज केले आहेत. परंतु, त्याठिकाणी अर्ज केल्यानंतर लाभासाठी खूपच वाट पाहावी लागते. स्वत:च्या मोबाईलवर किंवा ‘सीएससी’ केंद्रातून अर्ज केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी तलाठ्यांकडून होते आणि त्यानंतर तो अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जातो.
मात्र, तहसील कार्यालयातून अर्ज केल्यास तहसीलदारांमार्फत तो अर्ज काही दिवसांत जिल्हास्तरावर पाठवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातूनच अर्ज करणे सोयीचे ठरत आहे.
योजनेचा लाभ ‘असा’ घेता येईल
१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ-अ आणि रेशनकार्ड, आधारकार्ड, बॅंक पासबूक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा तहसील कार्यालयात योजनेचे काम पाहणाऱ्यांकडे नेऊन द्यावे.
तेथे ‘पीएम किसान’ ॲपवर त्या शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. तहसील, जिल्हा व राज्य स्तरावर त्या अर्जाला मान्यता मिळाली की त्याच दिवसापासून संबंधित शेतकऱ्याला योजनेचा लाभ सुरु होतो.
अडीच लाख शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत
राज्यातील दोन लाख ३९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करूनही लाभ मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे योजनेचे सन्वयक संजय हिवाळे यांनी सांगितले.
दरम्यान, सव्वालाख अर्ज हे तालुकास्तरावरच तहसीलदारांच्या मान्यतेच्या प्रतिक्षेत असल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा व राज्य स्तरावर देखील तेवढेच अर्ज प्रलंबित आहेत. केवळ अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने तेवढे शेतकरी वर्षभरापासून योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
१ ते १२ फेब्रुवारीपर्यंत ‘आधार’ला जोडा बॅंक खाते
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत १३ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केले आहे. इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत १ ते १२ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम राबविली जाणार आहे. बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता गावातील टपाल (पोस्ट) कर्मचाऱ्यांमार्फत उपलब्ध करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने १३ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत १४.३२ लाख लाभार्थीची बँक खाती आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांकावरून इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडता येणार आहे.
४८ तासात ते आधार क्रमांकाला जोडले जाईल. कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय प्रमाणीकरण करता येणार असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.