१०९ दिव्यांग शेतकऱ्यांवर कर्जबोजा

प्रशांत कांबळे
मंगळवार, 25 जून 2019

जिल्हानिहाय अर्जदार 
पालघर २, नाशिक १, धुळे २, जळगाव १, नंदुरबार ३, नगर २, सोलापूर १४, बीड १०, जालना २, उस्मानाबाद २, हिंगोली २, परभणी २, अमरावती ११, वाशिम २, बुलडाणा २६, गोंदिया २०, वर्धा ७

मुंबई - कर्ज न मिळताच राज्यातील १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा चढविण्याचा प्रताप राज्याच्या अपंग व वित्त विकास महामंडळाने केला आहे. सातबारावर कर्जाची नोंद असल्याने या अर्जदारांना दुसरीकडून कर्ज मिळणे अवघड झाले आहे. दुष्काळी बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कांतिलाल शिंदे यांनी २०१७ मध्ये एक लाखाच्या कर्जासाठी अपंग व वित्त विकास महामंडळाकडे अर्ज केला होता. मात्र, त्यांना कर्ज न देताच त्यांच्या शेताच्या सातबारावर एक लाखाचा बोजा चढविण्यात आल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उघड केल्यानंतर याप्रकारे राज्यात १०९ प्रकरणे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २० हजार ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी या शेतकऱ्यांनी अपंग महामंडळाकडे अर्ज केले होते. मात्र, दोन वर्षांपासून शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

दिव्यांगांना अपंग विकास महामंडळातून दीर्घ मुदतीचे आणि थेट कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्जाचा लाभ दिला जातो. यासाठी अर्जदारांना स्थावर मालमत्तेचे पुरावे द्यावे लागतात. अर्जाबरोबर या शेतकऱ्यांनी त्यांचा सातबाराही जोडलेला होता. फक्त अर्ज केला म्हणून या शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज घेतल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 109 Debtors on Farmers