"युती'च्या काळात 11 हजार शेतकरी आत्महत्या 

तात्या लांडगे
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

सोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या काळात राज्यातील 11 हजार 241 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात 17 हजार 703 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली होती. मदत व पुनर्वसन विभागाने ही आकडेवारी गोळा केली आहे. 

सोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या काळात राज्यातील 11 हजार 241 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात 17 हजार 703 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली होती. मदत व पुनर्वसन विभागाने ही आकडेवारी गोळा केली आहे. 

देशात 1965-66 पासून विविध पिकांचे संकरित वाण निर्मितीमुळे हरित क्रांतीचा पाया घातला गेला. त्यानंतरच्या पंचवार्षिक योजनांमुळे शेती विकासावर विशेष भर देण्यात आला आणि पाहता पाहता देश पर्यायाने महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. विहिरी व भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी जलयुक्‍त शिवार, नालाबांध असे उपक्रम हाती घेण्यात आले. पारंपरिक शेतकऱ्यांनी व्यापारक्षम शेतीची कास धरण्याकरिता कृषी विद्यापीठांमधील सुधारित तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा म्हणून पीक प्रात्यक्षिके, मेळावे, प्रदर्शने, प्रचारसभा असे कार्यक्रम हाती घेण्यात आले. मात्र, नैसर्गिक आपत्तीचा दर दोन-तीन वर्षांनी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची मूळ मागणी कोणीच विचारात घेतली नाही. त्यामुळे राज्यात आत्महत्या सुरूच असून किंबहुना मागील तीन-चार वर्षांत त्यात वाढच झाल्याचे दिसून येत आहे. 

या आकडेवारीबाबत विचारण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हिवाळी अधिवेशन जवळ आल्याने त्यांनी बोलण्यास नकार दिला. 

आत्महत्येची प्रमुख कारणे 
- शेतमालांचे अस्थिर दर अन्‌ हमीभावाची प्रतीक्षा 
- उसाची एफआरपी, तूर-हरभरा हमीभावासाठी विलंब 
- कर्जमाफीची ठप्प झालेली प्रक्रिया अन्‌ बॅंकांचा ठेंगा 
- खासगी सावकारांचा चक्रवाढीने व्याजदर 
- शेतीमाल प्रक्रिया उद्योगाची अपुरी संख्या 
- कुटुंबाचा खर्च, मुला-मुलींचे लग्न, बेरोजगारी अन्‌ कोलमडलेले शेतीचे अंदाजपत्रक 

विभागनिहाय आत्महत्या 
(2015 ते 8 नोव्हेंबर 2018) 
कोकण : 10 
नाशिक : 1,720 
पुणे : 331 
औरंगाबाद : 3,851 
अमरावती : 4,097 
नागपूर : 1,232 
एकूण : 11,241 

मृत्यूनंतरही मिळेना लाभ 
2001 ते 2017 या कालावधीत राज्यातील 26 हजार 963 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी 13 हजार 700 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना सरकारकडून अर्थसाह्य मिळाले आहे. यावर्षीच्या एक हजार 967 पैकी 833 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना अर्थसाह्य मिळाले आहे. मागील 18 वर्षांपासून राज्यातील 14 हजार 411 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. 

शेतकरी आत्महत्या 
युती सरकार : 11,241 
आघाडी सरकार : 17,703


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 thousand farmers committed suicide during the BJP-shivsena