
Solapur News: बारावी परीक्षेत १११ कॉपी बहाद्दर! इंग्रजी, फिजिक्स पेपरवेळी कॉपी सापडल्या; दहावीच्या परीक्षेवर विशेष वॉच
Solapur News : इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत आतापर्यंत राज्यभरात १११ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेल्याची माहिती बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी दिली.
त्यात संभाजीनगर विभागात अव्वल असल्याचेही त्या म्हणाल्या. उद्यापासून (गुरुवार) दहावीची परीक्षा सुरु होत असन त्यावरही भरारी व बैठे पथकांची नजर असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील अंदाजित १४ लाख ३० हजार परीक्षार्थी आहेत. बारावीसाठी कला, विज्ञान, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम व इतर एकूण १६४ विषय आहेत.
२१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून आतापर्यंत ४९ विषयांचे पेपर संपले आहेत. दरम्यान, यंदा कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी महसूल, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची देखील मदत घेतली जात आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधीक्षक भेटी देत आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र भरारी पथक, बैठे पथक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी एक विशेष पथक असे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे यंदा कॉपी करण्याचे प्रमाण खूपच कमी झाल्याचेही ओक यांनी यावेळी सांगितले. दहावीच्या परीक्षेला राज्यातील १६ लाख विद्यार्थी असून ओक यांनी परीक्षार्थींना यावेळी शुभेच्छा दिल्या.
‘इंग्रजी अन् फिजिक्स’ला सर्वाधिक कॉपी
यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुणे बोर्डाकडून ‘नांदेड पॅटर्न’ राबविला जात आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी न करता परीक्षा देऊन भविष्याची उज्वल वाट धरावी हा त्यामागील हेतू आहे. बैठे पथकांच्या तुलनेत भरारी पथकानेच कॉपी करणाऱ्या मुलांना पकडले आहे.
आतापर्यंत बारावीची परीक्षा देणाऱ्या १११ विद्यार्थी कॉपी केसमध्ये अडकले आहेत. त्यात संभाजीनगर व नागपूर, पुणे विभागाची अधिक मुले आहेत.
इंग्रजी व फिजिक्स विषयाच्या पेपरवेळी ९० पेक्षा अधिक मुले कॉपी करताना सापडली आहेत. भरारी पथकानेही इंग्रजी, रसायनशास्त्र, फिजिक्स, बायोलॉजी अशा विषयांच्या पेपरवेळीच परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे नियोजन केले होते.
‘दहावी’साठी सोलापूर जिल्ह्यात १६ विशेष पथके
दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून (गुरुवारी) बोर्डाची परीक्षा सुरु होत असून त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ६४ हजार ४२४ विद्यार्थी आहेत.
१७६ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार तथा नायब तहसीलदारांचे एक पथक तर जिल्ह्यासाठी १६ विशेष पथके नेमली आहेत.
बैठे पथक देखील परीक्षा केंद्रावर ठाण मांडून असेल. परीक्षा हॉलमध्ये सोडताना चार जणांची टीम प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच आत सोडणार आहे.