दुरावलेल्या बारा जोडप्यांचे घडविले मनोमीलन

भडगाव - समझोत्यानंतर एकत्र आलेल्या जोडप्यासमवेत पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, योजना पाटील, सुशीला पाटील, मीना बाग आदी.
भडगाव - समझोत्यानंतर एकत्र आलेल्या जोडप्यासमवेत पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, योजना पाटील, सुशीला पाटील, मीना बाग आदी.

भडगाव - सध्या धावपळीच्या व ताणतणावाच्या युगात पती-पत्नीतील घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, भडगाव पोलिस ठाणे व दक्षता समितीच्या सदस्यांनी तालुक्‍यातील दुरावलेल्या १२ जोडप्यांमध्ये समन्वय घडवून आणला. ‘त्या’ जोडप्यांनी त्यांच्यातले मतभेद विसरून पुन्हा एकत्र सुखाने संसार करण्याचा आणाभाका घेतला. त्यांना साडी-चोळी भेट देऊन पोलिस स्टेशनतर्फे सत्कार केला.

पती-पत्नींत किरकोळ कारणावरून खटके उडून घटस्फोटपर्यंत जाण्याचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याचदा तर अगदी किरकोळ गोष्टीवरून वाद टोकाला पोहचतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी पोलिस ठाणे व महिला दक्षता समितीकडे आल्या होत्या. त्याअनुशंगाने अशा जोडप्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा संकल्प महिला दक्षता समिती व पोलिस ठाण्याने केला अन्‌ तो त्यांनी पूर्णत्वासही नेला.

तालुक्‍यात १२ जोडपे किरकोळ कारणावरून वेगवेगळे राहत होते. महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेत या जोडप्यांना एकत्र आणले. भडगाव पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या समवेत बैठक झाली. दोघांना समजवण्यात आले. काहींचे आई-वडील, सासू-सासरे ही येथे आले होते. त्यांनी वादावर पडदा पाडत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. एकमेकांपासून दुरावलेले मने समजोत्यानंतर हातात हात घालून एकत्र घरी गेले.

पोलिसांकडून साडी-चोळी भेट
भडगाव पोलिस व दक्षता समितीकडून सामज्यंस कार्यक्रमाअंतर्गत मनोमीलन झालेल्या महिलांना साडी-चोळी भेट देऊन नव्याने सुरू होणाऱ्या सांसारिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. किरकोळ कारणांवरून मोडीत आलेले नात्याची पुन्हा गुंफण झाल्याचा आनंद या जोडप्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. टोकाला गेलेले जोडप्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळाला तर एकमेकांपासून दूर जाणारे हात पुन्हा एकत्र येऊ शकतात हे या १२ जोडप्यांच्या मिलनानंतर सिद्ध झाले आहे. याशिवाय अशा कार्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही अधोरेखित झाले आहे.

दुरावलेल्या १२ जोडप्यांमध्ये समन्वय घडवून पुन्हा एकत्र आणण्यात आम्हाला यश आले. ते पुन्हा एकत्र नांदणार आहेत याचे समाधान आहे. किरकोळ वादावरून ते एकमेकांपासून दुरावले होते. त्यांच्या समझोत्यानंतर ते एकत्र आले. 
- धनंजय येरूळे, पोलिस निरीक्षक, भडगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com