राज्यात सव्वा लाख कोटीची रेल्वे प्रकल्पांची कामे - प्रभू

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - राज्यात हाती घेण्यात आलेल्या नगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन लोहमार्ग निर्मितीसाठीचे आवश्‍यक भूसंपादन येत्या जुलैअखेरपर्यंत पूर्ण करून ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी. या लोहमार्गाच्या निर्मितीचे काम गतिमान होईल यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज "वर्षा' या शासकीय निवासस्थानी राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात साधारण एक लाख 36 हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची कामे मंजूर किंवा सुरू असून ही सर्व कामे जलदगतीने पूर्ण करून महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे अधिक विकसित आणि सक्षम करण्यात येईल, अशी माहिती प्रभू यांनी या बैठकीत दिली. या रेल्वे प्रकल्पांच्या विविध कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

या वेळी बेलापूर-सीवुड्‌स-उरण नवीन मार्गाची निर्मिती, ठाकुर्ली, कुर्ला, शाहाड येथील उड्डाण पुलांचे बांधकाम, पारसिक बोगदा येथील अतिक्रमणे, पश्‍चिम लोहमार्गावर सहाव्या मार्गाची निर्मिती, "एमयूटीपी' टप्पा दोन; तसेच टप्पा तीनमधील विविध कामे, मुंबई तसेच राज्यातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची निर्मिती, जळगाव येथील उड्डाण पुलाचा प्रश्न, आर्वी-वरुडदरम्यान नवीन मार्गाचे सर्वेक्षण करणे, कोकण रेल्वेच्या रोहा-वीरदरम्यान मार्ग दुहेरी करणे अशा विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

Web Title: 1.25 lakh crore railway project work