'प्रतिभा-वेदनेतूनच अस्सल साहित्यनिर्मिती '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

वसई - "काटेमुक्त जीवनातून चांगले साहित्य निर्माण होऊ शकत नाही; त्यासाठी काटा काळजात घुसावा लागतो. प्रतिभा आणि वेदनेच्या संगमातूनच अस्सल साहित्यनिर्मिती होत असते‘, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी रविवारी (ता. 25) भुईगाव येथे केले.

 

वसई - "काटेमुक्त जीवनातून चांगले साहित्य निर्माण होऊ शकत नाही; त्यासाठी काटा काळजात घुसावा लागतो. प्रतिभा आणि वेदनेच्या संगमातूनच अस्सल साहित्यनिर्मिती होत असते‘, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी रविवारी (ता. 25) भुईगाव येथे केले.

 

"सहयोग‘ संस्थेने भरवलेल्या सहाव्या "वसई साहित्य-कला महोत्सवा‘त दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात उत्तम कांबळे बोलत होते. वनाधिपती विनायकदादा पाटील, फादर ऍण्ड्य्रू रॉड्रिग्ज, तलासरीच्या कुष्ठरोग पुनर्वसन केंद्राच्या सिस्टर मोनिका मस्करनीस, पत्रकार रवींद्र आंबेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
शेतकऱ्यांपासून लेखकांपर्यंत आत्महत्यांचे पेव फुटले असून मरणाच्या घटना वाढून जगण्याचे मार्ग क्षीण होताना दिसत आहेत. जगातील असुरक्षितता वाढत जाऊन माणूस तुटत चालला आहे. या वातावरणात अशी संमेलनेच सर्जनशीलता जपत असून माणसाला जगण्याची नवी ऊर्मी देण्याचे प्रयत्न करत आहेत, असे गौरवोद्‌गार कांबळे यांनी काढले.
या वेळी तलासरी-वडोली येथील दयानंद हॉस्पिटलला "सामाजिक कृतज्ञता‘ पुरस्काराने गौरवण्यात आले. रुग्णालयाच्या सिस्टर मोनिका मस्करनीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विनायकदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रुग्णालयाच्या विकासासाठी वर्षभरात 51 लाखांचा निधी संकलित करण्याची घोषणा "सहयोग‘चे सायमन मार्टिन यांनी केली; तसेच स्वतः एक लाखाचे योगदान देत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात स्टीफन परेरा (मृत्युंजय), सचिन मेन (पक्षिजगत), ऍन्थनी परेरा (परी आली माझ्या घरी, पैशांचे झाड), धोंडू पेडणेकर (सूर आले जुळूनी) आणि सुनील जाधव (मला समजून घ्या) या लेखकांना "सहयोग ग्रंथ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव दत्ता नर, कामगार संघटनेचे भरत पेंढारी, कोमसापचे कार्याध्यक्ष शेखर धुरी, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर म्हात्रे आदी या वेळी उपस्थित होते.

शनिवारी (ता. 24) सायंकाळी एसटी कामगार संघटनेने काढलेल्या वृक्षांच्या आणि ग्रंथांच्या दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. चित्रकार आबिद सुरती, प्रा. दिगंबर गवळी, ज्यो डिसोजा, दत्तात्रय ठोंबरे आणि चार्ली कोरिया यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन या वेळी करण्यात आले. त्याचे संयोजन शशिकांत बने आणि फिलिप डिमेलो यांनी केले. अखेरच्या सत्रातील साहित्य चर्चेत अनेक मान्यवरांनी भाग घेतला. या वेळी कवितांचे चित्रांकन सुभाष गोंधळे यांनी; तर सूत्रसंचालन मनोज आचार्य यांनी केले.

जोखीम घेतली पाहिजे
निसर्ग माणसाला डोळे देतो; पण दृष्टी देण्याचे काम लेखक साहित्यातून करत असतो. जोखीम घेतल्याशिवाय प्रभावी लेखन होत नाही, असे उत्तम कांबळे म्हणाले. नवा विचार आणि बदलासाठी नेमके उद्दिष्ट घेऊन लिहिणे गरजेचे आहे. केवळ अनुभवांचे प्रतिबिंब म्हणजे साहित्य नव्हे; तर त्या अनुभवांतील संवेदनांचे कंगोरे शोधून वाचकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे खरे साहित्य, असे विवेचन त्यांनी केले.