
१२६८ शिक्षकांवर ‘अतिरिक्त’ची टांगती तलवार! १५ जूनपर्यंत ३८,०५३ विद्यार्थ्यांचे 'आधार' जमा करावेच लागणार
सोलापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित व स्वयंअर्थसहायता शाळांमधील ३८ हजार ५३ विद्यार्थ्यांकडे अजूनही आधारकार्ड नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दुसरीकडे ५८ हजार विद्यार्थ्यांच्या आधारमधील त्रुटींची दुरूस्ती झालेली नाही. दरम्यान, एप्रिलपासून मुदतवाढ देत देत आता शासनाने त्यासाठी १५ जूनपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नाही, तो बोगस समजून तेवढे शिक्षक अतिरिक्त (कमी) केले जाणार आहेत.
खासगी अनुदानित शाळांसह जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये एकच विद्यार्थी दोन शाळांमध्ये प्रवेशित दिसत आहे. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्याचे नाव आहे, पण त्याचे आधारकार्डच नाही. एक वर्षाचा काळ लोटला, तरीपण त्या विद्यार्थ्याचे आधारकार्ड शाळेच्या रेकॉर्डमध्ये दिसत नाही. काहींनी पहिल्या शाळेचे शैक्षणिक शुल्क न भरल्याने संबंधित शाळेने त्याचा प्रवेश रद्द केला नाही, पण तो विद्यार्थी २०२२-२३ मध्ये दुसऱ्याच शाळेत शिकला आहे.
अशा अनेक अडचणींमुळे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका व खासगी अनुदानित शाळांमधील २२ ते २५ हजार विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची वस्तुस्थिती आहे. स्वयंअर्थसहायता शाळांना शासनाचे फारसे निर्बंध लागू होत नसल्याने त्यांनीही आधार प्रमाणीकरणाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यांच्यावर आता शिक्षणाधिकारी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
उर्वरित शाळांना मात्र १५ जूनपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदवावेच लागणार आहे. तसेच आधारकार्डमधील त्रुटी देखील त्यांना त्याच मुदतीत करावे लागणार आहे. नाहीतर जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे सव्वातीनशे तर उर्वरित शाळांमधील नऊशे शिक्षक अतिरिक्त होतील, अशी सद्य:स्थिती आहे.
३८ हजार विद्यार्थ्यांकडे आधारकार्डच नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित व स्वयंअर्थसहायता शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ९० टक्क्यांपर्यंत झाले आहे. पण, अजूनही जवळपास ३८ हजार विद्यार्थ्यांकडे आधारकार्डच नसल्याचे दिसत आहे. १५ जूनपर्यंत संबंधित शाळांना त्याची पूर्तता करावीच लागणार असून शासनाने ही अंतिम मुदत दिली आहे.
- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
३० जुलैपर्यंत शिक्षक भरतीचे नियोजन
शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आता संचमान्यतेची प्रक्रिया सुरु झाली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आधार बेस्ड विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरून ही संचमान्यता होणार आहे. १५ जूननंतर सर्वच शाळांची संचमान्यता होईल आणि त्यानंतर रिक्त शिक्षकांची भरती संबंधित जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जूनअखेरीस सुरु होणार आहे. ३० जुलैपर्यंत ही रिक्तपदे १०० टक्के भरली जाणार आहेत.