मुंबई- पुणे हायपरलूपसाठी 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

अमेरिकेतील नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाची चाचणी सुरू असलेल्या ठिकाणाला फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. त्यांनी हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉइड यांच्याशी चर्चा केली. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्क्‍लेव्हदरम्यान कराराची घोषणा केली होती. 

पुणे : मुंबई- पुणे मार्गासाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित कंपनीच्या अधिकारी यांच्यात अमेरिका भेटीत झालेल्या चर्चेनुसार, हायपरलूप लवकरच आपले अभियंते पुण्याला पाठविणार आहेत. पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक निश्‍चित केला आहे. या तंत्रज्ञानासाठीची 70 टक्के सामग्री आणि उपकरण राज्यातच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्‌विट केली आहे. 

अमेरिकेतील नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाची चाचणी सुरू असलेल्या ठिकाणाला फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. त्यांनी हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉइड यांच्याशी चर्चा केली. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्क्‍लेव्हदरम्यान कराराची घोषणा केली होती. 

या अनुषंगाने मुंबई- पुणे मार्गासाठीची प्रकल्प उपयोगिता पडताळण्यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यात शंभर टक्के इलेक्‍ट्रिक कार्यक्षम प्रणालीमुळे कार्बनचे दीड लाख टन उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार आहे. शिवाय, या प्रकल्पामुळे वेळेची बचत, पर्यावरणाचे रक्षण, अपघातांची संख्या कमी, वाहतूक कोंडी नाही, असे सामाजिक आणि आर्थिक फायदे होणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. पुणे- मुंबई मार्गावरील 15 किलोमीटरचा चाचणी मार्ग उभारावा, याबाबत अहवालात नमूद करण्यात आले आहे. परंतु हा मार्ग कोणत्या भागात उभारणार, याबाबत पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

पुण्याची आघाडी 
अत्यंत वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या हायपरलूपचा प्रकल्प अमेरिका, भारत, रशिया, दुबई या चार देशांमध्ये राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुण्याचा समावेश असून, व्यवहार्यता अहवाल (प्री-फिझिबिलिटी रिपोर्ट) करण्यापर्यंत पुण्याने आघाडी घेतली आहे. हायपरलूपमुळे पुणे-मुंबई प्रवास अर्ध्या तासात शक्‍य होणार आहे. 

Web Title: A 15-km experimental track for Mumbai-Pune Hyperloop