पंधरा मिनिटांत सर्वकाही संपले!

akola
akola

अकोला : गोव्यात समुद्रकाठावर सहलीला गेलेल्या 14 मित्रांपैकी पाच जणांचा सकाळी 6.15 वाजता कलंगुट बीचवर काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. अवघ्या पंधरा मिनिटात सर्वकाही संपले! गोव्याच्या बिचवर मृत्यू तांडव सुरू असताना मोठ्या उमरीतील विठ्ठल मंदिर परिसरात घटनेची वार्ता पोहोचली आणि एकच हाहाकार उडाला.

अकोल्यातील पाच तरुणांचा कलंगुट बीचवरील समुद्र किनाऱ्यावर सोमवारी पहाटे बुडून मृत्यू झाला. मोठी उमरीतील विठ्ठल नगरमध्ये राहणारी ही पाचही मुलं सामान्य घरातील आहेत. मृतांमध्ये दोन भावांचा, एका कुटुंबातील एकुलता एक वारस आणि जुळ्या भावामधील एकाचा समावेश आहे. क्रिकेट खेळणाऱ्या सवंगड्यांपैकी 14 मित्र गोव्यात फिण्यासाठी शनिवारी अकोल्यातून निघाले होते. कदाचित त्यांच्या पैकी कुणालाही याची पुसटशी कल्पणाही नसेल की गोव्यात सहलीसाठी निघालो आहे पण, तेथेम मृत्यू त्यांची प्रतीक्षा करतो आहे. रविवारी रात्री मडगावला पोहोचल्यानंतर टॅक्सी करून 14 मित्र कलुंगडला पोहोचले. तेथे सोमवारी पहाटे बीचवर उतरल्यानंतर समुद्रांच्या लाटांनी त्यांना मोहीत केले. पाहता पाहता सर्व जण पाण्यात उतरले. सोबत न आलेल्या मित्रांना सेल्फी काढून गोव्यातील सहलीचे फोटोही पाठविले. मात्र, त्यातील पाच तरूणांसाठी सकाळी 6.15 वाजता पाठविलेला सेल्फी शेवटचा ठरला. 6.30 वाजेपर्यंत 14 पैकी पाच जण खवळलेल्या अरबी समुद्राच्या लाटेसोबत वाहून केले. डोळ्यासमोर मित्रांना लाटेत वाहून जात असल्याचे पाहून इतरांचा थरकाप उडाला. ही वार्ता गोव्यातून अकोल्यात पोहोचताच विठ्ठलनगरावर शोककळा पसरली.

बाबा शब्द एेकण्यापूर्वीच...
मृतकांपैकी प्रितेश नंदागवळी हा दर्यापूर पोलिस स्टेशनला कार्यरत होता. त्याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. त्याची पत्नी ही प्रसुतीसाठी शहरातच माहेरी गेली आहे. प्रितेशवर घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याचे बाबा हे बोबडे बोल एेकण्यापूर्वीच काळाने घाला घातला. याच घटनेत प्रितेशचा लहान भाऊ चेतनही बुडला. एकाचवेळी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या आईला धक्का बसला आणि ती खालीच कोसळली. प्रितेशचा मोठ्या भावाचीही प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

आईची भेटही झाली नाही!
डॅम उर्फ उज्ज्वल वाकोडे हा एकूलता एक मुलगा. उज्ज्वल गोव्याला निघाला तेव्हा त्या त्याची आई बाहेरगावी गेली होती. मला घरी येऊ दे, तोपर्यंत कुठेस जाऊ नकोस म्हणून आईने उज्ज्वला गळ घातली होती. मात्र, आईला न भेटताच मित्रांसोबत गोव्याला निघून गेलेल्या उज्ज्वला अखेर आईची भेटही घेता आली नाही. त्याच्या आईला झालेल्या घटनेची माहिती देण्यात आली नाही. मात्र, घरी नातेवाईकांची गर्दी होऊ लागल्याने तिच्या मनात मुलाचे काही बरेवाईट तर झाले नाही ना, अशी शंका येऊ लागली.

किरणने सोडली साथ
गोव्यात गेलेल्या 14 मित्रांमध्ये किरण म्हस्के हा युवकही होता. समुद्रात बुडाल्यानंतर किरणचा मृतदेह सोमवारी रात्री उशिरापर्यंत मिळाला नव्हता. किरण हा जुळ्या भावापैकी एक. त्यातील एक कायमची साथ सोडून गेला आहे.

घरातील कर्ता मुलगा गेला
गोव्यातील बिचवर समुद्रात बुडालेल्या युवकांपैककी शुभम वैद्य हा सामान्य कुटुंबातील मुलगा. तो मेडीकलवर काम करून कुटुंबाला आधार देत होता. कुटुंबाचा आधार सोमवारी समुद्रात बुडाला.

अन् नातेवाईंकांना घरी जाण्यापासून थांबविले
गोव्यातील घटनेबाबत पाचही तरुणांच्या घरी माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे घटनेची माहिती मिळाल्यानंतर आलेल्या नातेवाईकांना रस्त्यातच थांबविण्यात आले होते. नातेवाईकांना परिसरातील युवकांनी उज्ज्वलच्या घरी न जाण्याची विनंती केली होती.

समुद्रातील सेल्फीचे फोटो
जेव्हा ही सर्व मुले गोव्यासाठी निघाली होती, त्यावेळी किरण हा त्याच्या मोठ्या भावाला सतत व्हीडीओ कॉल करून त्याच्याशी गंमती शेअर करीत होता. तर प्रितेश व चेतन यांनी मित्रांसोबत समुद्रात काढलेल्या सेल्फी पहाटेच मित्रांना स्टेटस्‌द्वारे पाठविले होते. हे सर्व फोटो त्यांचे मित्र पाहत होते. परंतु, अवघ्या १५ मिनीटांनी त्यांना आपले मित्र बुडाल्याची वार्ताचा फोन येतो आणि सर्व मित्रांच्या आनंदावरच विरजन पडले.

पहाटेचा ‘तो’ आवाज कानावर पडणार नाही
गोव्याला सहलीला गेलेल्या मित्रांचा क्रिकेट संघ होता. पहाटेच ही सर्व मंडळी क्रिकेट खेळायला चायचे. त्यांच्यापैकी किरण म्हस्के हा पहाटे 5-5.30 वाजता मित्रांना क्रिकेट खेळण्यासाठी जाण्याकरिता आवाज देत होता. किरणचा गोव्यातील घटनेत दुर्दैवी अंत झाल्याने आता ‘तो’ आवाज कधीच कानावर पडणार नाही. आम्हाला आता पहाटे कोण उठविणार, असे त्याचे मित्र सांगत असताना डोळ्यात पाणी आले.

खासदार संजय धोत्रेंनी केली मदत
पाच मुलांच्या बुडून मृत्यू झाल्याची वार्ता खासदार संजय धोत्रे यांना कळताच त्यांनी तेथील खासदार माधवराव सोयेकर यांच्याशी संपर्क साधून या मुलांना मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार खासदार सोयेकर यांनी त्या मुलांना मदतही केल्याचे खासदार धोत्रे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com