चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही दागिना गेला नाही चोरी

प्रमोद जेरे
Sunday, 27 December 2020

जनतेच्या मनातील आमदार निवडून आल्याने शहरातील सराफा व्यावसायिकांनी त्यांच्याकडे असलेल्या दीडशे किलो वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने बांधून स्वागत कमान तयार केली.

सांगली : गेल्या १९७२ च्या निवडणुकीमध्ये वसंतदादा पाटलांच्या उमेदवाराला हरवून मिरजेचे डॉ. नरसिंह पाठक निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसविरोधी शहर, अशी ओळख असलेल्या मिरजेतील सर्व सराफा व्यापाऱ्यांनी डॉ. पाठक यांच्या स्वागतासाठी तब्बल दीडशे किलो वजनाची सोन्या-चांदीची  कमान तयार केली होती. विशेष म्हणजे या मिरवणुकीत २० हजाराच्या जवळपास लोक सहभागी झाले होते. तरीही यामधील थोडंही सोने चोरीला गेले नव्हते. 

हेही वाचा - ‘फोन पे कार्यालयातून बोलत आहे, तुमच्या तक्रारीचे समाधान करणार आहे’ यावर विश्वास ठेवला...

काँग्रेसविरोधी मिरज -
वसंतदादा पाटील यांची दिल्ली ते गल्ली अशी ओळख होती. वसंतदादा पाटील हे पदमाळ गावचे होते. ते गाव सांगलीच्या जवळ होते. त्यामुळे दादा नेहमी सांगलीला जवळ करतात आणि मिरजेला दुय्यम लेखतात, अशी मिरजेच्या जनतेची भावना होती. तसेच मिरजेला रेल्वे होती. सांगलीला रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणायचे, असे वसंतदादा पाटलांचे स्वप्न होते. मिरजेमध्ये रेल्वेचे जंक्शन आहे. त्यावरच मिरजेची आर्थिक घडी बसलेली आहे. मात्र, वसंतदादा पाटील हे रेल्वे जंक्शन सांगलीला नेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे काँग्रेसकडून मिरजेला वारंवार डावलले जात असल्याची भावना मिरजेच्या जनतेत होती.  त्यामुळे सर्व काँग्रेसविरोधी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला धक्का द्यायचाच असे ठरविले. मात्र, उमेदवार कोण? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला. त्यावेळी डॉ. नरसिंह पाठक या सेवाभावी डॉक्टरांचे नाव समोर आले. 

हेही वाचा - लाल मिरची बळीराजाच्या डोळ्यांत आणणार पाणी; मंदीमुळे...

बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासणारे डॉक्टर -
डॉ. नरसिंह पाठक अत्यंत सेवाभावी होते. ते दर आठवडी बाजारात जायचे. पण ते खरेदीसाठी नाही, तर रुग्णांची सेवा करण्यासाठी. आठवड्यात जवळपास ५ ठिकाणी बाजार भरायचा. डॉ. पाठक हे गाडीच्या डिक्कीत औषधांसह वैद्यकीय साहित्य भरायचे अन् बाजारात जात होते. बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासायचे, ते देखील एकही रुपया न घेता. त्यामुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड आदरभाव होता. ते शस्त्रक्रिया विशारद होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण त्यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी यायचे. एकदा माजी पंतप्रधान चंद्रशेखर देखील त्यांच्याकडे उपचारासाठी आले होते. डॉ. पाठक यांचा शस्त्रक्रियेमध्ये हातखंड होता. तसेच त्यांची सेवाभावी वृत्ती पाहून जनता त्यांच्यावर खुश होती. त्यामुळे सर्व काँग्रेसविरोधी पक्षांनी डॉ. पाठक यांना निवडणुकीत उभे करायचे ठरविले. डॉ. पाठक यांनी १९६७ ची निवडणूक लढविली. मात्र, त्यामध्ये फक्त ३ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. तरीही डॉक्टरांचे सेवाकार्य सुरूच होते.

हेही वाचा - कपाटाची चावी तयार करून गेले दोन युवक अन् कुटुंबाच्या पायाखालची सरकली जमीन 

'एक व्होट-एक नोट' -
डॉ. पाठक यांनी १९७२ च्या निवडणुकीचा अर्ज भरला. मिरजेत काँग्रेसविरोधी वातावरण असल्याने जनतेने डॉ. पाठक यांचा प्रचार केला. त्यावेळी त्यांनी लोकवर्गणीतून निवडणूक लढविणार असल्याचे ठरविले. त्यामुळे जनतेला 'एक व्होट-एक नोट' द्या असे आवाहन केले. प्रचाराला जाताना ते प्रत्येकाकडून एक रुपया घ्यायचे. त्याचा निवडणुकीत किती खर्च झाला याचा हिशोब चौकात लिहून ठेवत होते. 

हेही वाचा - पूर आला, पंचनामे झाले अन् काहीशी मदतही मिळाली; मग आता...

मिरवणुकीत सोन्या-चांदीच्या कमानीने स्वागत -
काँग्रेसने डॉ. पाठक यांच्याविरोधात दिलेल्या उमेदवाराचे निधन झाले होते. त्यामुळे बापूसाहेब जामदार यांना तिकीट देण्यात आले. मात्र, काँग्रेसविरोधी मिरज, अशी शहराची ओळख असल्याने जनतेनी डॉ. पाठक यांना बहुमताने निवडून दिले. जनतेच्या मनातील आमदार निवडून आल्याने शहरातील सराफा व्यावसायिकांनी त्यांच्याकडे असलेल्या दीडशे किलो वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने बांधून स्वागत कमान तयार केली. कमान उभी करण्यासाठी अच्युतराव भुर्के, बळवंतराव भुर्के, सामिराव शिर्के, मुरळीधर सलगर आदींनी ही कमान उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. यामध्ये  सोन्याच्या लांब मण्यांच्या माळा, कोल्हापुरी साज, कंबरपट्टे, पायातले तोळे, लांब मण्यांच्या माळा, आदी दागिने होती. संपूर्ण मिरज शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी या कमानीने डॉ. पाठक यांचे स्वागत करण्यात आले. तसेच या मिरवणुकीमध्ये २० हजाराच्या जवळपास लोक सहभागी झाले होते. मात्र, या सोन्याच्या कमानीमधील थोडंसही सोनं चोरीला गेलं नाही, हे विशेष. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य केले जात होते.

 प्रतिमेत याचा समावेश असू शकतो: बाहेरील

   (डॉ. पाठक यांच्या स्वागतासाठी तयार केलेली सोन्या-चांदीची कमान)

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केली आंबेडकरांची बदनामी; सोशल मीडियावर टाकला आक्षेपार्ह मजकूर

सराफा व्यावसायिकांचा प्रस्थापितांना विरोध -
'प्रस्थापितांविरोधातील हे त्या काळातील बंड होतं. वसंतदादा पाटलांकडून मिरजेला सातत्याने डावलले जात असल्याची भावना जनतेत होती. त्यालाच लोकांनी दिलेले हे चोख प्रत्युत्तर होते. कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सराफा व्यावसायिक भाग घेत नाही. मात्र, त्यावेळी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सराफा व्यावसायिकांनी प्रस्थापितांना विरोध दर्शविला होता.' 
- अच्युतराव भुर्के, सराफा व्यावसायिक, मिरज  

संपादन - भाग्यश्री राऊत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 kg gold and silver ornaments arch was made to welcome the MLA in 1972 assembly election miraj of sangli