अकरावीच्या 19 हजार विद्यार्थ्यांनी विशेष फेरीकडे फिरवली पाठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी 14 ऑगस्टला दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात आली आहे. या यादीत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 56 हजार 375 विद्यार्थ्यांपैकी 48 हजार 664 विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे अलॉटमेंट देण्यात आले आहे.

मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या विशेष फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या तब्बल 19 हजार 704 विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. या फेरीत प्रवेश मिळालेल्या केवळ 28 हजार 960 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीची वाट पाहावी लागणार आहे. 

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी 14 ऑगस्टला दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात आली आहे. या यादीत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 56 हजार 375 विद्यार्थ्यांपैकी 48 हजार 664 विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे अलॉटमेंट देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना 16 व 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्‍चित करायचा होता. परंतू महाविद्यालयांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिलेल्या माहितीनुसार 19 हजार 704 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. महाविद्यालयांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यास सायंकाळी सात वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे या संख्येत थोडीफार भर पडणार आहे. 

अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सात हजार 711 विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विशेष फेरीत प्रवेश न घेतलेल्या आणि आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता 21 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य फेरीनुसार प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रथम प्राधान्य फेरीसाठी पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी 20 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

प्राधान्य फेरीचे प्रकार 
- पहिला प्रकार - दहावी परीक्षेत 80 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या प्रकारामध्ये येतात. 
- दुसरा प्रकार - दहावी परीक्षेत 60 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या प्रकारामध्ये येतात. पहिल्या प्रकारामधील ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. असे विद्यार्थीसुध्दा या फेरीमध्ये सहभागी होउ शकतात. 
- तिसरा प्रकार - दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी या प्रकारामध्ये येतात. पहिल्या व दुसऱ्या प्रकारातील ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत, असे विद्यार्थीसुद्धा या फेरीमध्ये सहभागी होउ शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 thousand students of FYJC have ignored the special round