राज्यात १९ टक्के जास्त पाऊस; नगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

जम्मू आणि काश्‍मीर, गुजरात, बिहार, मेघालय, गोवा, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. तेथे सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के जास्त पाऊस पडला.

पुणे - राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा १९ टक्के जास्त पाऊस पडला आहे. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद नगर जिल्ह्यात झाली असून वाशीम, अमरावती आणि गोंदिया या विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. 

राज्यात १ जून ते २३ ऑगस्टदरम्यान ७६१.७ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत ९०६.१ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत १९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
देशात सरासरी ओलांडणार?
यंदा देशात सर्वाधिक पाऊस सिक्कीममध्ये पडला. तेथे सरासरीपेक्षा ७३ टक्के जास्त पाऊस झाला. त्या खालोखाल जम्मू आणि काश्‍मीर, गुजरात, बिहार, मेघालय, गोवा, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. तेथे सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के जास्त पाऊस पडला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, हरियाना, पंजाब, राजस्थान या बहुसंख्य राज्यांमध्ये पावसाने सरासरी (उणे १९ ते १९ टक्के) गाठली आहे.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील पावसाची स्थिती...

  • यंदा मुंबई, मुंबई उपनगर, नगर, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६० टक्‍क्‍यांहून जास्त पाऊस.
  • धुळे, जळगाव, जालना, पुणे, लातूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत २० ते ५९ टक्के जास्त पाऊस.
  • सातारा, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नंदूरबार, बुलडाणा, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली.
  • वाशीम, अमरावती आणि गोंदिया येथे सरासरीपेक्षा ५९ ते २० टक्के कमी पाऊस पडला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19percent more rainfall in the state highest rainfall recorded in Nagar district