निवडणुकीसाठी दोन लाख कर्मचारी, अधिकारी वर्ग गुंतल्याने सरकारी कामे मंदावणार

सिद्धेश्‍वर डुकरे
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - दहा महानगरपालिका, पंचवीस जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 283 पंचायत समित्यांच्या दोन टप्प्यांतील निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सुमारे चार कोटींपेक्षा जास्त पात्र मतदारांच्या या "मिनी विधानसभा' निवडणुकीसाठी सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी पुढील महिनाभर व्यस्त राहणार आहेत. हा अधिकारी वर्ग गुंतल्याने सरकारी कामे मंदावणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. आचारसंहिता लागू होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठीची सर्व तयारी आयोग सध्या करीत आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत सरकारच्या विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी तसेच महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी गुंतून पडणार आहेत. निवडणुकीसाठी तयारी करताना आयोगाने मतदान केंद्रे, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील सुरक्षा यासाठी पोलिस बल अधिकचे मागविले आहे. त्यासाठी गृह विभागाशी बोलणी सुरू आहे. दहा महानगरपालिकांसाठी एक लाख 12 हजार 971 कर्मचारी वर्ग सहभागी होणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल विभागाचे चारशे अधिकारी काम पाहणार आहेत.

असा आहे पसारा
- महानगरपालिकांसाठी लागणारे कर्मचारी - 1 लाख 12 हजार 971
- मतदान यंत्रे (ईव्हीएम) - 50 हजार
- मतदान केंद्रे - 22 हजार 595
- निवडणूक निर्णय अधिकारी - 113
- जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी कर्मचारी - 1 लाख 73 हजार 768
- मतदान यंत्रे - 1 लाख 50 हजार
- मतदान केंद्रे - 34 हजार 754
- निवडणूक निर्णय अधिकारी - 287

Web Title: 2 lakh employee for election work