esakal | कोरोना नियंत्रणासाठी मराठवाड्याला 20 कोटी तर कोकणला 109 कोटी रुपये 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष (घरातील विलगीकरण वगळून) स्थापन करणे, त्यांच्यासाठी तात्पुरती निवास व्यवस्था करणे, अन्न, कपडे, वैद्यकीय देखभाल, कोरोना चाचणीचे नमुने गोळा करणे, तपासणी/छाननी, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी सहाय्य किंवा क्‍लस्टर कंटेनमेंट संदर्भातील कार्यवाहीसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च, उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधने, व्हेंटिलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर व इतर साधनांचा खर्च करण्यासाठी ही रक्कम वापरता येणार आहे.

कोरोना नियंत्रणासाठी मराठवाड्याला 20 कोटी तर कोकणला 109 कोटी रुपये 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : देशात व राज्यात कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने वाढलेली रोगराई नियंत्रित करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांसाठी झालेला खर्च भागविण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांना 109 कोटी रुपये तर मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांना 20 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या दोन्ही विभागातील जिल्ह्यांसाठी 129 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. 

विभागीय आयुक्तांकडून हा निधी मराठवाडा व कोकण महसूल विभागातील जिल्ह्यांना वाटप केला जाणार आहे. ठाण्यासाठी पाच कोटी, पालघरसाठी चार कोटी, रायगडसाठी पाच कोटी, बृहन्मुंबई महापालिकेसाठी 60 कोटी, मीरा-भाईंदर महापालिकेसाठी दहा कोटी, वसई-विरार महापालिकेसाठी पाच कोटी, कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी दहा कोटी, नवी मुंबई महापालिकेसाठी दहा कोटी एवढा निधी देण्यात आला आहे.

मराठवाडा विभागातील औरंगाबादसाठी साडेपाच कोटी, जालन्यासाठी दोन कोटी, परभणीसाठी दोन कोटी, हिंगोलीसाठी दोन कोटी, नांदेडसाठी दोन कोटी, बीडसाठी दोन कोटी, लातूरसाठी चार कोटी व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लॉक डाऊन कालावधीत अडकलेल्या इतर राज्यातील कामगारांसाठी मदत छावण्या व इतर ठिकाणी आश्रय घेतलेल्या स्थलांतरित कामगारांसह, बेघर व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय देखभाल करण्यासाठी होणारा खर्च देखील या निधीतून भागविला जाणार आहे. राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार हा निधी मराठवाडा व कोकण या दोन महसूल विभागासाठी वितरित करण्यात आला आहे.