अतिवृष्टीचा दोन हजार शाळांना फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

एक लाख ६३ हजार विद्यार्थ्यांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे राज्यातील आठ शिक्षण विभागापैकी सहा विभाग बाधित झाले आहेत. २१ जिल्ह्यांतील १५५ तालुक्‍यांत नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या दोन हजार १७७ शाळा बाधित झाल्या आहेत. याचा फटका १ लाख ६३ हजार २७५ विद्यार्थ्यांना बसेल, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

पुणे - ‘‘राज्यातील २१ जिल्ह्यांतील दोन हजार १७७ जिल्हा परिषद शाळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दुरुस्ती, पोषणआहार, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी या शाळांना ५७ कोटींचा निधी आवश्‍यक असून शिक्षण विभागाकडून तो खासबाब म्हणून देण्यात येईल,’’ अशी घोषणा शालेय शिक्षण, क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी केली.

राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून घेण्यात येत आहे. त्याचा एकत्रित आढावा घेण्यासाठी शेलार पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पूरबाधित जिल्ह्यांतील संबंधितांची आढावा बैठक येथे घेतली.

शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागातील संचालक आणि शिक्षणाधिकारी या वेळी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ५३ पूर्ण वर्ग खोल्यांचे बांधकाम आणि काहींची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. राज्यातील २६० शाळांमधील २७ हजार ९०५ विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांचे नुकसान झाले आहे. या सुविधा पूर्ववत करण्यासाठी ५७ कोटी एवढ्या निधीची गरज असल्याचे विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावर हा निधी थेट शाळेच्या बॅंक खात्यामधे जमा करण्यात येणार आहे. पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांची माहिती गोळा करून त्यांना निधी देण्यात येईल, असेही शेलार यांनी सांगितले. 

स्थानिक पातळीवर निर्णय घ्या
पूरग्रस्त भागातील शाळा व परिसर संबंधित शासकीय यंत्रणेकडून निर्जंतुक करण्यात यावा, पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍या व वर्गखोल्यांची स्वच्छते याविषयी परिपत्रक काढावे, ज्या शाळांमध्ये पूरग्रस्तांसाठी तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशा शाळांतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नजीकच्या खासगी शाळांमध्ये करता येईल का, अथवा दोन सत्रात शाळा भरविण्याची व्यवस्था होऊ शकते का, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे शेलार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2000 School Loss by Heavy Rain