राज्यातील दोन हजारांवर शिक्षकांचा जीव टांगणीला

हिरालाल रोकडे
शुक्रवार, 18 मे 2018

शहादा - राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी 2018 अखेर प्रलंबित दोन हजारांवर प्रस्तावांना शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांकडून मान्यता मिळाली खरी; पण या शिक्षकांचा शालार्थ प्रणालीत अद्याप समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, त्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाची बैठक पुढील आठवड्यात होत आहे.

शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाइन केले आहे. त्यासाठी शालार्थ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात येतात. ती समाविष्ट करण्यापूर्वी मान्यता घेताना अपेक्षित सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधिताला शालार्थ आयडीसह पासवर्ड दिला जातो. शालार्थ प्रणालीत नावाच्या समावेशानंतरच संबंधित कर्मचाऱ्याचे नाव वेतन पत्रकात जनरेट होते.

नवी समिती
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने कर्मचाऱ्यांना मान्यता दिल्यानंतर दोन महिन्यांच्या आत वेतन सुरू व्हावे, यासाठी शालार्थ प्रणालीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, अशी मागणी पेपर तपासणी बहिष्कार आंदोलनाच्या वेळी केली होती. त्याला अनुसरून शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना केली. यात शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयातील चार अधिकाऱ्यांसह राज्यातील आठ विभागातील प्रत्येकी दोन असे 16 अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता ही समिती या दोन हजारांवर शिक्षकांना मान्यतेचा निर्णय घेणार आहे.

विभागनिहाय प्रस्ताव
मुंबई 9
नाशिक 206
पुणे 92
कोल्हापूर 1333
लातूर 137
औरंगाबाद 64
नागपूर 322
अमरावती 114
एकूण 2277

Web Title: 2000 teacher life