उजनी धरणात 21 टक्के पाणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

सोलापूर - यंदाच्या पावसाळ्यात शंभर टक्के भरलेले धरण हळूहळू कमी होऊ लागले आहे. पाण्याच्या होणाऱ्या वापरामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटू लागला आहे. आजअखेर धरणात 21.09 टक्‍के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरण उणे स्थितीमध्ये होते. 

सोलापूर - यंदाच्या पावसाळ्यात शंभर टक्के भरलेले धरण हळूहळू कमी होऊ लागले आहे. पाण्याच्या होणाऱ्या वापरामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटू लागला आहे. आजअखेर धरणात 21.09 टक्‍के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरण उणे स्थितीमध्ये होते. 

मागील वर्षी जिल्ह्यात पाऊस पडला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. धरणात पाणी नसल्यामुळे त्यावर अवलंबून असलेली ऊसशेती पूर्णपणे कोलमडली होती. गेल्यावर्षी उसाची लागवड न झाल्यामुळे यंदा जानेवारीतच साखर कारखाने बंद झाले आहेत. यंदा धरण शंभर टक्के भरले होते. त्यामध्ये असलेल्या पाण्यामुळे कालवा व नदीच्या माध्यमातून शेती व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. आजही मुख्य कालव्यातून दोन हजार 350 क्‍युसेकने पाणी सोडणे सुरू आहे. त्याचबरोबर बोगद्यातून सोडण्यात येणारा 900 क्‍युसेकचा विसर्ग आज सकाळी बंद करण्यात आला आहे. कारण सीना नदीच्या माध्यमातून ते पाणी शिरापूर बंधाऱ्यापर्यंत आले आहे. त्यामुळे बोगद्याचा विसर्ग बंद केला आहे. 

पाणीपट्टी भरून करा सहकार्य 
उन्हाळा तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे शेतीमधील पिकांची मागणी वाढत चालली आहे. त्यातच पिण्यासाठीही पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा जपून वापर करायला हवा, असे अधिकारी सांगतात. उजनी धरणाशी संबंधित असलेले अधिकारी मार्च महिन्यामुळे पाणीपट्टी वसुलीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. पाणीपट्टीच्या वसुलीचा संबंध त्यांच्या वेतनाशी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करण्याची अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत. 

आकडे बोलतात 
धरणाची आजची स्थिती 
-एकूण पाणीसाठा ः 74.96 टीएमसी 
-उपयुक्त पाणीसाठा ः 11.30 टीएमसी 
-उपयुक्त पाण्याची टक्केवारी ः 21.09 
-मागील वर्षीची टक्केवारी ः वजा 29.59 

Web Title: 21 per cent of the water in Ujani dam