शिक्षणासाठी लोकसहभागातून 237 कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

राज्यात शंभर टक्के शाळा डिजिटलचे शिक्षण सचिवांचे उद्दिष्ट

राज्यात शंभर टक्के शाळा डिजिटलचे शिक्षण सचिवांचे उद्दिष्ट
सोलापूर - राज्याच्या शिक्षण विभागाने 22 जून 215 पासून "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत राज्यात 237 कोटी रुपये लोकसहभागाच्या माध्यमातून जमा झाले आहेत. या पैशांचा उपयोग चांगल्या कामासाठी केला जात आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम सुरू होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी पूर्णत्वाकडे जात आहे. या अभिनव उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगळी वाटचाल सुरू झाली आहे. शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बदलू लागली आहे. विशेष म्हणजे हे करत असताना सरकारला आर्थिक फटका बसणार नाही, याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. शिक्षणाच्या या चळवळीमुळे राज्यात डिसेंबर 2016 पर्यंत 237 कोटी रुपये लोकसहभागाच्या माध्यमातून उभे राहिले आहेत. लोकांचा पैसा शैक्षणिककामासाठी वापरला गेल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्या शाळा आहेत, अशी भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे. अनेकांनी वस्तूही शाळेला भेट दिल्या आहेत.

या उपक्रमामध्ये राज्यातील शंभर टक्के शाळा डिजिटल करण्याचे धोरण सचिव नंदकुमार यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाची वाटचाल सुरू झाली आहे. धुळे जिल्ह्यातील शाळा 100 टक्के डिजिटल झाल्या आहेत. त्यानुसार इतर जिल्ह्यांतील शाळा डिजिटल करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे.

डिसेंबपर्यंत 26 हजार शाळा प्रगत
राज्यात डिसेंबरपर्यंत 26 हजार 404 शाळा प्रगत झाल्या आहेत. त्यामध्ये 19 हजार 981 प्राथमिक शाळा, तर सहा हजार 424 उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. मे महिन्यात राज्यातील प्रगत शाळांचा नव्याने आढावा घेऊन प्रगत शाळा जाहीर केल्या जाणार आहेत.

Web Title: 237 crore fund for education by people involved