सरकारकडून 242.53 कोटींची आर्थिक मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 मे 2017

बॅंकेतील ठेवींची रक्कम 574.57 कोटी; मंत्रालय आगीपूर्वीचे ऑडिट अधांतरी

बॅंकेतील ठेवींची रक्कम 574.57 कोटी; मंत्रालय आगीपूर्वीचे ऑडिट अधांतरी
मुंबई - मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या 58 महिन्यांत 22,633 जणांना 242 कोटी 52 लाख 87 हजार 640 कोटींची भरीव मदत राज्य सरकारने केली असून, 3161 अर्ज फेटाळले आहेत. सध्या आठ बॅंकांत मुख्यमंत्री निधीच्या ठेवीची रक्कम 574.57 कोटी असून, 41 कोटी 63 लाख 35 हजार 519 कोटींचे व्याज सरकारला मिळाले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्याचबरोबर 21 जून 2012 रोजी मंत्रालयातील आगीत मुख्यमंत्री सहायता निधीचा सर्व अभिलेख नष्ट झाल्यामुळे त्यापूर्वीचे ऑडिट अद्याप पूर्ण न झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहायता निधीबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडे 1 जानेवारी 2005 पासून विविध माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सचिवालयाने सांगितले, की 21 जून 2012 रोजी मंत्रालयात लागलेल्या आगीत निधी कक्षातील सर्व कागदपत्रे नष्ट झाली आहेत. त्यामुळे 22 जून 2012 ते 30 एप्रिल 2017 पर्यंतची माहिती दिली. या दरम्यान 21 हजार 943 वैद्यकीय मदत केली गेली असून, एकूण रक्कम 183 कोटी 15 लाख 930 रुपये आहे, तर अपघाती मृत्यू, जळीतग्रस्त, कृत्रिम अवयवरोपणासाठी 690 लोकांस एकूण 59 कोटी 37 लाख 86 हजार 710 रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय मदतीसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव, कागदपत्रांची पूर्तता, प्रचलित कार्यपद्धतीनुसार देय असलेल्या आजारांसाठी पात्र असल्यास रुग्णांची निकड विचारात घेऊन अर्थसहाय मंजूर करण्यात येते. वैद्यकीय मदतीव्यतिरिक्त अन्य प्रकरणी अर्थसहायाची विनंती प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री सहायता निधीच्या ध्येय उद्दिष्टानुसार अर्थसहाय अनुज्ञेय असेल आणि मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अर्थसहायाचा विचार करण्यात येतो; अन्यथा अर्ज प्रलंबित ठेवण्यात येतो. 2015 वर्षापासून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वैद्यकीय कारणास्तव प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी एकूण तीन हजार 161 अर्ज फेटाळले आहेत. 21 जून 2012 रोजी मंत्रालयाला लागलेल्या आगीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचा सर्व अभिलेख जळून नष्ट झाला आहे. या कालावधीचे ऑडिट पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसाचा जमा रकमेचा तपशील उपलब्ध करून देणे शक्‍य असल्याचे गलगली यांना कळविले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया वगळता अन्य सात बॅंका खासगी आहेत, ज्यात 574 कोटी 56 लाख 55 हजार 753 रुपयांच्या ठेवी आहेत.

Web Title: 242.53 crore financial help by government