मद्यावरील उत्पादन शुल्कात 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई - अद्याप अनेकांची नववर्षाच्या स्वागताची झिंग उतरली नसताना राज्य सरकारने नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी तळीरामांच्या खिशाला हात घातला आहे. सरकारने भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्कात 15 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून अमलात आली असून, यामुळे सरकारला अतिरिक्त 500 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

शेतकरी कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलच्या करात केलेली कपात, सातवा वेतन आयोग यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला खड्डा पडला आहे. हा खड्डा भरून काढण्यासाठी ऑगस्ट 2018 पासून भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचे प्रस्तावित होते. ही वाढ करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आज अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त गाठला. उत्पादन शुल्कातील वाढ आजपासून अमलात आली असून, त्यामुळे व्हीस्की, स्कॉंच, वोडकाचे दर सरासरी 15 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत. यापूर्वी 2013 मध्ये अशी दरवाढ करण्यात आली होती. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील शुल्क वाढवताना सरकारने देशी मद्याच्या शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. 

उत्पादन शुल्क विभागाला डिसेंबर 2018 अखेर मद्यापासून आठ हजार 995 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नव्या दरवाढीमुळे यंदा महसुलात आणखी 500 कोटी रुपयांची भर पडेल. चालू आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क विभागाला 15 हजार 343 कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या महसुलात भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यापासून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा सात हजार कोटी रुपयांचा आहे, अशी माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आलेली दारूबंदी, महामार्गावरील बार आणि दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय यामुळे विभागाच्या महसुलावर परिणाम झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी उत्पादन शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: 25% increase in production of alcohol