राईनपाडा हत्याकांड प्रकरणी 25 लाखांची मदत

25 lakhs help in raping of Ranipada massacre
25 lakhs help in raping of Ranipada massacre

धुळे : राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेतील 23 संशयितांना आज (सोमवारी) साक्री न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे एकूण पंचवीस लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. पीडित कुटुंबाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आक्रोशात, मन हेलावणाऱ्या वातावरणात पाच जणांचे मृतदेह दुपारी चारनंतर मंगळवेढ्याकडे (जि. सोलापूर) नातेवाइकांसह रवाना झाले. 

आदिवासीबहुल काकरपाडा, राईनपाड्यात रविवारी (ता. 1) दुपारी बाराला मुलांना पळविणे, किडन्या चोरी करणारी टोळी दाखल झाल्याची अफवा पसरली. राईनपाड्यात आठवडे बाजार असल्याने पंचक्रोशीतील गाव- पाड्यांमधील तीन ते चार हजारावर ग्रामस्थ खरेदी- विक्रीच्या व्यवहारासाठी दाखल झाले होते. 

पाच जणांचा बळी 

असे असताना एसटी बसने आलेले, साध्या वेशातील नाथपंथीय डवरी समाजातील आणि गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्या भारत भोसले (वय 45), भारत माळवे (45), दादाराम भोसले (36, रा. खवे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), राजू भोसले (47, रा. गोंदवून, कर्नाटक), अग्नू इंगोले (20, रा. मानेवाडी, हुन्नर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांच्यावर काही तरुणांचा मुले पळवून नेण्याविषयी संशय बळावला. त्यातून हिंसक जमावाने अमानुष, क्रौर्याची परिसीमा गाठत या पाच जणांना बेदम मारहाण करत राईनपाडा ग्रामपंचायतीत डांबले. त्यात दगड, विटा, लोखंडी सळई, खुर्च्या, मिळेल त्या साहित्याने या पाच जणांना अक्षरशः ठेचून मारले. त्यामुळे पाचही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. 

राईनपाडा गाव रिकामे 

आम्ही भिक्षेकरी आहोत हे सांगण्याच्या प्रयत्नातील पाचही जणांचे हिंसक जमावाने काहीही ऐकून घेतले नाही. परिणामी, सोशल मीडियासह गाव- पाड्यातील अफवांनी या पाच जणांचा बळी घेतला. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पथक राईनपाड्यात पोहोचले. त्यांनाही हिंसक जमावाने मारहाण केली. नंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांसह फौजफाटा राईनपाड्यात दाखल झाला. त्यामुळे वृद्ध महिला, पुरुष वगळता सर्वच ग्रामस्थच जंगलाकडे पसार झाले. राईनपाड्यात बंदोबस्त असून गाव रिकामे असल्याने स्मशानशांतता आहे.

मृतदेह घेतले ताब्यात

या घटनेच्या 'क्‍लिप' सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केवळ राज्यच नव्हे तर देश हादरला आहे. मृतांच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्या वेळी मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. मुख्यमंत्र्यांनी वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केल्यावर आणि या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, 'एसआयटी'कडे तपास, या खटल्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मृत व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान, वारसांना सरकारी नोकरी, भिक्षुकी व्यवसाय करणाऱ्यांना स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षिततेची हमी, संरक्षणासाठी कायदा संमत होण्यासाठी सरकार पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे लेखी आश्‍वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मागणीकर्त्यांना दिल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आले. नंतर पिंपळनेर ग्रामस्थ, पोलिसांच्या आर्थिक मदतीनंतर मृतदेहांसह नातेवाईक वाहनांनी दुपारी चारनंतर मंगळवेढ्याकडे रवाना झाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com