हिरे व्यापाऱ्यांना 25.59 कोटींचा गंडा 

अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

मुंबई - हिरे व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून 25.59 कोटींना गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) कल्पेश शहा (वय 36) या ब्रोकरला अटक केली. या प्रकरणी दुर्गा मामतोला (34) या महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई - हिरे व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून 25.59 कोटींना गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) कल्पेश शहा (वय 36) या ब्रोकरला अटक केली. या प्रकरणी दुर्गा मामतोला (34) या महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेमंत शाह यांच्यासह अन्य 12 हिरे व्यापाऱ्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. 2013 मध्ये हा प्रकार सुरू झाला. त्या वेळी या व्यापाऱ्यांनी 25 ते 35 हजार रुपये प्रतिकॅरेट या दराने विक्रीसाठी हिरे व दागिने दुर्गाला दिले होते. दुर्गाने हे हिरे विक्रीसाठी कल्पेशला दिले. ते दोघेही सुरुवातीला नियमितपणे शाह व अन्य व्यापाऱ्यांना हिरे विक्रीची रक्कम पाठवत. त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला. 2013 ते 2016 पर्यंत या व्यापाऱ्यांनी सुमारे 55 कोटी रुपयांचे हिरे या दोघांकडे विक्रीसाठी दिले होते. अधूनमधून हिरेविक्रीची रक्कम त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्यामुळे 2016 पर्यंत सुमारे 33 कोटी रुपये व्यापाऱ्यांना परत मिळाले. उर्वरित 22 कोटी 32 लाख रुपयांची रक्कम परत न मिळाल्याने व्यापाऱ्यांना या दोघांचा संशय आला. अखेर विक्रीची रक्कम व हिरे दोन्हीही न मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांनी "ईओडब्ल्यू'कडे तक्रार केली. त्यानुसार 2 फेब्रुवारीला चारकोप पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून "ईओडब्ल्यू'ने तपासाला सुरुवात केली. 

त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मधुसूदन नाईक यांच्या पथकाने गुरुवारी मालाड येथील घरातून कल्पेशला अटक केली. या प्रकरणी दुर्गाविरोधातही भादंवि कलम 406, 420 व 120(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

वरील 12 व्यापाऱ्यांबरोबरच देवांग भुवा, आशीष शाह या व्यापाऱ्यांनीही या दोघांविरोधात तक्रार नोंदवली. या दोघांनी आपल्याला अनुक्रमे एक कोटी 77 लाख व एक कोटी 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे भुवा व शाह यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फसवणुकीची रक्कम पुढे 25 कोटी 59 लाखांवर गेल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: 25.59 crore diamond merchants discipleship

टॅग्स