पंचवीस बॅंकांत 2600 कोटींचा गैरव्यवहार 

पीटीआय
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - बांधकाम प्रकल्पांसाठी बॅंकांकडून आणि ग्राहकांकडून पैसे उकळणारा झूम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवर्तक आणि संचालक विजय चौधरी याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉंडरिंगअंतर्गत मंगळवारी (ता. 2) मुंबईत अटक केली. बनावट कंपन्यांच्या आधारे पंचवीस बॅंकांमध्ये 2650 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका चौधरीवर ठेवण्यात आला आहे. 

मुंबई - बांधकाम प्रकल्पांसाठी बॅंकांकडून आणि ग्राहकांकडून पैसे उकळणारा झूम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवर्तक आणि संचालक विजय चौधरी याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉंडरिंगअंतर्गत मंगळवारी (ता. 2) मुंबईत अटक केली. बनावट कंपन्यांच्या आधारे पंचवीस बॅंकांमध्ये 2650 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका चौधरीवर ठेवण्यात आला आहे. 

चौधरीला इंदोरमधील "ईडी'च्या विशेष न्यायालयात आज हजर करण्यात आले. "ईडी'ने चौधरीविरोधात केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) मनी लॉंडरिंग कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी "ईडी'ने जुलै 2015 मध्ये अमेरिकेतील कॅलिफॉर्नियातील 1,280 कोटी रुपयांच्या जमिनीवर टाच आणली होती. 

केवळ कागदोपत्री करार करून चौधरीने बॅंकांची दिशाभूल केली. चौधरी याने कुटुंबीयांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नावे तब्बल 485 बनावट कंपन्या सुरू करून पैसे उभारल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय अमेरिकेत 15, ब्रिटनमध्ये 3, स्वित्झर्लंडमध्ये 1, सिंगापूरमध्ये 7, जर्मनीमध्ये 4, दुबईमध्ये 9, चीन आणि झिंबाब्वेमध्ये प्रत्येक दोन बनावट कंपन्या सुरू केल्या आहेत. यातून त्याने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे "ईडी'ने म्हटले आहे. "सीबीआय'ने झूम डेव्हलपर्सवर आरोपपत्र दाखल केले होते. 

"झूम'चा आणखी एक संचालक शरद कब्राला यापूर्वीच "ईडी'ने अटक केली आहे. दरम्यान, चौधरी गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. "ईडी'ने याप्रकरणी आतापर्यंत झूम डेव्हलपर्सची 130 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. बंगळूर, इंदोर, मुंबई आणि रायगडमधील एकूण 23.80 एकर जमिनीवर टाच आणली आहे. 

हमी, प्रतिहमीतून उकळली कर्जे 
इंदोर आणि मुंबईतून काम करणाऱ्या झूम डेव्हलपर्सने युरोप आणि अमेरिकेत बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पंजाब नॅशनल बॅंक, सिंडिकेट बॅंक, कॅनरा बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया आणि युनियन बॅंक या पाच बॅंकांकडून हमी (बॅंक गॅरंटी) आणि प्रतिहमी (काउंटर गॅरंटी) घेतली होती. यातून 966 कोटींची फसवणूक केल्याचा ठपका चौधरीवर ठेवण्यात आला; मात्र प्रत्यक्षात झूम डेव्हलपर्सने 25 हून अधिक बॅंका आणि शेकडो ग्राहकांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. या बॅंकांकडून 2650 कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय "ईडी'ने व्यक्त केला आहे. 

Web Title: 2600 crore fraud in twenty-five banks