कैद्यांमार्फत वर्षात 27 कोटींची कमाई 

दिलीप कुऱ्हाडे 
सोमवार, 13 मे 2019

राज्याच्या विविध कारागृहांतील कैद्यांनी हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकामातून 2018-19 या आर्थिक वर्षात तेवीस कोटी, तर शेती, मत्स्यव्यवसाय, सेंद्रिय खत निर्मिती यातून चार कोटी अशी 27 कोटींची कमाई कारागृहांना करून दिली आहे, अशी राज्याचे कारागृह महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली. 

येरवडा - राज्याच्या विविध कारागृहांतील कैद्यांनी हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकामातून 2018-19 या आर्थिक वर्षात तेवीस कोटी, तर शेती, मत्स्यव्यवसाय, सेंद्रिय खत निर्मिती यातून चार कोटी अशी 27 कोटींची कमाई कारागृहांना करून दिली आहे, अशी राज्याचे कारागृह महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली. 

जाधव म्हणाले, "" कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन' हे कारागृहाचे ब्रिदवाक्‍य आहे. राज्यातील सत्तेचाळीस कारागृहांपैकी नऊ मध्यवर्ती कारागृहे, नऊ खुली कारागृहे व एक महिला कारागृहात विविध उद्योगांत सुमारे 2200 कैद्यांना गुंतवून ठेवले आहे. येरवडा, नाशिक, नागपूर कारागृहात हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकाम, बेकरी, रसायन उद्योग सुरू आहे. या माध्यमातून कैद्यांनी यंदा तेवीस कोटी रुपये उत्पन्न घेतले आहे.'' 

""कारागृहात कैद्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या फर्निचर, देव्हारे, किचन ट्रॉली, सतरंजी, टॉवेल, बेडशीट आदी वस्तूंना मोठी मागणी आहे. लाकडी टेबल, खुर्च्या, छपाई, पुस्तक बांधणी आदीला सरकारी कार्यालयांमधून मागणी असते. त्यामुळे वर्षभर कैद्यांना काम असते. यासाठी कुशल कैद्यांना 61 रुपये, अर्धकुशल कैद्यांना 55 रुपये, तर अकुशल कैद्यांना 44 रुपये रोज दिला जातो,'' असे जाधव यांनी सांगितले. 

कारागृहाच्या मालकीची येरवडा, पैठण आदी ठिकाणी शेकडो एकर शेती आहे. यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्ये, सोयाबीन, फळे, ऊस, भाज्या, गायी, म्हशी पालन, मत्स्यशेतीसह सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. या कृषी उत्पादनाचा उपयोग कैद्यांच्या जेवणासाठी केला जातो. 
-विठ्ठल जाधव, कारागृह महानिरीक्षक 

पैठणी, महालक्ष्मीचा प्रसाद 
येरवडा खुल्या कारागृहात पैठणी साड्या तयार केल्या जातात, तर कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात महिला कैदी महालक्ष्मीच्या प्रसादाचा लाडू बनवितात. 2018-19 या आर्थिक वर्षात त्यांनी 11 लाख 24 हजार लाडून बनवून एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. 

विविध कारागृहांतील उत्पन्न  
- येरवडा ः 5 कोटी 81 लाख 
- नाशिक रोड ः 5 कोटी 42 लाख 
- नागपूर ः 4 कोटी 6 लाख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 crores earnings through prisoners