गारपीट नुकसानीचे २९ जिल्ह्यांचे नाहीत पंचनामे! कांदा अनुदानाची घोषणा, पण कार्यवाही शून्य

राज्यातील एक कोटी ५० लाख हेक्टरपैकी यंदा ६३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान अतिवृष्टी, सततचा पाऊस व गारपिटीने झाले आहे. अजूनही अनेक बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. दुसरीकडे कांदा अनुदानाची घोषणा झाली, पण कार्यवाही काहीच नाही, ही वस्तुस्थिती आहे.
गारपीट झाल्याने पिके भुईसपाट
गारपीट झाल्याने पिके भुईसपाटeSakal

सोलापूर : हमीभावाच्या प्रतीक्षेतील बळिराजा गारपीट, अतिवृष्टी व अवकाळी, दुष्काळ, अशा नैसर्गिक संकटांना तोंड देत आहे. राज्यातील एक कोटी ५० लाख हेक्टरपैकी यंदा ६३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान अतिवृष्टी, सततचा पाऊस व गारपिटीने झाले आहे. अजूनही अनेक बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. दुसरीकडे कांदा अनुदानाची घोषणा झाली, पण कार्यवाही काहीच नाही, ही वस्तुस्थिती आहे.

राज्यात सत्ता कोणाचीही असो दररोज सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांना शेतीमालासाठी हमीभाव असून नैसर्गिक संकटात नुकसानीच्या जवळपास मदत हवी आहे. पण, आजवर तसे झालेले नाही. रात्रंदिवस मेहनत करून मोठा खर्च करूनही हातातोंडाशी आलेले पीक नैसर्गिक संकटात बाधित होते. चांगले आलेच तर त्याला बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे बॅंकांचा व खासगी सावकारांचा डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत जातो आणि मुलांचे शिक्षण व मुलीचा विवाह करायचा कसा, असे प्रश्न त्याच्यासमोर उभे राहतात.

दरम्यान, २०२२-२३ या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांचे नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले आहे. तरीपण, ऑगस्ट-सप्टेंबरमधील भरपाई अजूनही मिळालेली नाही. कांदा अनुदानाची घोषणा झाली, पण अनुदान कधी मिळेल हे अधिकारी देखील स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. आता गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान झाले, पण पंचनामेच सुरु आहेत.

पीक कर्जासाठी ‘सिबिल’ची अट

राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती बॅंका सोडल्या तर बहुतेक बॅंकांची आर्थिक स्थिती बिकटच आहे. ६० ते १०० वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा बॅंका अजूनही नवीन शेतकऱ्यांना कर्जवाटप करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच शेती कर्जाची थकबाकी वाढल्याने आता राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकांकडून पीककर्ज देताना शेतकऱ्यांचा ‘सिबिल’ स्कोअर पाहिला जातो. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी डिसेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीला (एसएलबीसी) पत्र पाठवूनही बॅंकाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही, हे विशेष.

२९ जिल्ह्यांचे पंचनामे अहवालच नाहीत

गारपीट व अवकाळी पावसाने सोलापूरसह राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार मार्च महिन्यातील अवकाळीमुळे एक लाख ७३ हजार हेक्टरवरील पिकांचे विशेषतः: फळबागांचे नुकसान झाले आहे. शासनाने मदत देण्याची ग्वाही दिली, पण अजूनही ठाणे व रायगड वगळता २९ जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे मदतीसाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागेल, अशी स्थिती आहे.

२०२२-२३ मधील नुकसानीची स्थिती

  • जून ते सप्टेंबर

  • ६०.३७ लाख हेक्टर

  • उजनी कॅनॉल फुटल्याने नुकसान

  • १.२७ लाख हेक्टर

  • गारपिटीने नुकसान

  • १.७३ लाख हेक्टर

  • एकूण नुकसान

  • ६३.३७ लाख हेक्टर

  • सरकारकडून मदत मिळाली

  • ६९०० कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com