अभियांत्रिकीसाठी तीनशे महाविद्यालयांचे "पर्याय'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

यावर्षीही 'फ्रीज', 'स्लाईड' आणि 'फ्लोट'चा वापर

यावर्षीही 'फ्रीज', 'स्लाईड' आणि 'फ्लोट'चा वापर
नागपूर - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी पाच मे रोजी "एमएचसीईटी' पार पडली. यंदा सीईटीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उत्साह आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा विद्यार्थ्यांना तिप्पट पर्याय दिल्याने महाविद्यालयांची चिंता वाढली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम देताना तब्बल तीनशे महाविद्यालयामचे पर्याय द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे राज्यात पावणेचारशे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.

राज्यात काही वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या वाढली आहे. गतवर्षी जवळपास निम्म्या जागा रिक्त असल्याचे चित्र होते. अभियांत्रिकी प्रवेश दरवर्षी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे केल्या जाते. यावर्षी प्रथमच संचालनालयाद्वारे राज्यातील "सीईटी'साठी विभाग स्थापन केला आहे. या विभागाद्वारे एमबीए, एमसीए, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्राचे प्रवेश केल्या जाणार आहे.

गतवर्षी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना "फ्रीज', "स्लाइड' आणि "फ्लोट' असे तीन नवे पर्याय देण्यात आले होते. "फ्रीज' पर्यायामध्ये विद्यार्थ्यांने प्रवेश निश्‍चित केल्यावर तो बदलता येणे शक्‍य नव्हते. त्यानंतर "स्लाइड'मध्ये विद्यार्थ्याने महाविद्यालयाची निवड करून स्लाइड हे पर्याय घेतले. त्या विद्यार्थ्याला त्या महाविद्यालयात प्रवेशाचे वाटप करता येईल. मात्र, प्रक्रियेदरम्यान त्याला केवळ शाखा बदलण्याची मुभा होती. "फ्लोट' या पर्यायामध्ये प्रवेश प्रक्रियेतील शेवटल्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना कुठेही आणि कुठल्याही प्रकारच्या शाखेत बदल करता येणे शक्‍य होते. याही वर्षी प्रक्रियेत हे पर्याय ठेवण्यात आले आहेत. शिवाय तीनशे महाविद्यालयांचे पर्याय देता येणार आहे.

गतवेळीप्रमाणेच याही वर्षी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे "बहुपर्यायी' असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
 - चंद्रशेखर ओक, संचालक, उच्च व तंत्रशिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य

Web Title: 300 college option for engineering