श्री साई समाधी शताब्दी महोत्सवासाठी 3 हजार कोटींचा आराखडा

श्री साई समाधी शताब्दी महोत्सवासाठी 3 हजार कोटींचा आराखडा

मुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन व संस्थानमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या सुमारे 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मान्यता दिली. तसेच, केंद्राच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांनाही मान्यता देण्यात आली. हा महोत्सव जागतिक दर्जाचा व्हावा, यासाठी सर्व संबंधितांनी काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

श्री साईबाबा यांच्या महानिर्वाणास दि. 18 ऑक्‍टोबर 2018 रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त संस्थानच्यावतीने दि. 1 ऑक्‍टोबर 2017 ते 18 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समिती स्थापण्यात आली आहे. याची बैठक आज विधानभवनात झाली. या वेळी जलसंधारणमंत्री तथा नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सदस्य भाऊसाहेब वाघचौरे, आमदार स्नेहलता कोल्हे, सचिन तांबे, प्रतापराव भोसले, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके पाटील, सल्लागार अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. जमादार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक विशेष सेल तयार करावा. प्रलंबित रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावावीत. महोत्सव जागतिक स्तरावर पोचविण्यासाठी नियोजन करावे. याशिवाय बाह्यवळण रस्त्याची कामेही तातडीने करावीत.

श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती आराखडा समिती, तसेच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापण्यात आली आहे. उपसमितीने महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिल्यानंतर आज कृती समितीपुढे हा आराखडा सादर करण्यात आला. त्यानुसार श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत एकूण 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 789.62 कोटींची, तर दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 233 कोटी 55 लाख रुपयांची कामे होणार आहेत.
कामे खर्च
* दर्शनरांग उभारणे : 157.00 कोटी
* साईसृष्टी, प्लॅनेटोरियम व व्हॅक्‍स म्युझियम प्रकल्पाचे बांधकाम करणे : 141 कोटी,
* मल्टिमीडिया थीमपार्क अंतर्गत लेझर शो उभारणे : 72 कोटी,
* साईभक्तांसाठी अतिरिक्त प्रसाद भोजन व्यवस्था करणे : 1 कोटी,
* नवीन भांडार इमारतीचे बांधकाम : 13.71 कोटी,
* भक्तनिवासाच्या खोल्यांचे नूतनीकरण : 14.10 कोटी,
* संस्थान परिसरात विद्युतपुरवठा क्षमता वाढविणे : 14 कोटी,
* संस्थानचा वाढीव पाणीपुरवठा : 58.14 कोटी,
* माहिती व सुविधा केंद्र : 1.28 कोटी,
* घनकचरा व्यवस्थापन : 5.00 कोटी,
* स्वागत कमान उभारणे : 1.05 कोटी,
* संस्थानच्या रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या वाढविणे : 5.00 कोटी,
* शिर्डी विमानतळासाठी अर्थसाहाय्य : 5.00 कोटी,
* कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे : 20 कोटी,
* विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यासाठी : 25 कोटी,
* जमीन अधिग्रहण भाडे : 3 कोटी,
* साईभक्त कॅम्प व तात्पुरत्या स्वरूपात निवास व्यवस्थेसाठी व इतर सुविधा पुरविणे : 25.68 कोटी,
* पोलिसांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था : 1.50 कोटी
* तात्पुरते वाहनतळ, शौचालय व पाणीपुरवठा : 12.00 कोटी

शिर्डी नगरपंचायतीच्या निधीतून सुमारे 25.90 कोटींची, पोलिस विभागाकडील कामांसाठी 27.28 कोटी, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील कामांसाठी 14.71 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेरसाठी 34.51 कोटी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 56.80 कोटी, राज्य वीज वितरण कंपनीच्या कामांसाठी 25.76 कोटी, भारत संचार निगमच्या कामासाठी 2.12 कोटी, मध्य रेल्वेच्या कामासाठी 27.08 कोटी रुपयांच्या कामांना या वेळी मंजुरी देण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी
* बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम : 43.34 कोटी,
* साई निवास अतिथिगृहाच्या तळमजल्यावर व्हीव्हीआयपी सूटचे बांधकाम : 7 कोटी,
* साई शताब्दी कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करणे : 100 कोटी,
* साईसिटी प्रकल्पाची उभारणी : 180 कोटी,
* संस्थानसाठी पाणीपुरवठ्यासाठी निळवंडे धरणातून थेट पाइपलाइनसाठी : 139.60 कोटी,
* शेती महामंडळाच्या शिर्डी परिसरातील जमिनीसाठी : 369 कोटी,
* शिर्डी नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांसाठी भूसंपादन व विकसित करण्यासाठी : 229.98 कोटी.

विविध शासकीय विभागांमार्फत दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या कामांमध्ये शिर्डी नगरपंचायतीसाठी 160.87 कोटी, पोलिसांसाठी 27 कोटी, सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3.62 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर 538.70 कोटी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 220.50 कोटी, वीज वितरण कंपनीच्या कामासाठी 25.01 कोटी, राज्य परिवहन महामंडळासाठी 5 कोटी निधीची तरतूद सुधारित आराखड्यात करण्यात आली आहे.

त्याशिवाय, मौजे निमगाव कोऱ्हाळे येथील संस्थानच्या मालकीच्या हरितपट्ट्यातील जमिनी रहिवासी करणे; श्री साई प्रसादालय, साई आश्रम, स्टाफ क्वार्टर येथील इमारतींचे बांधकाम नियमित करणे, शेती महामंडळाची जमीन कायमस्वरूपी संस्थानला विकत देणे, विश्वस्त व्यवस्था अधिनियमामध्ये सुधारणा करणे आदींचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com