सोलापुरात ३००० ई-व्हेईकल! ‘महावितरण’ने उभारले २ चार्जिंग स्टेशन; ११.१२ रुपये प्रतियुनिट दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran charging stasion
सोलापुरात ३००० ई-व्हेईकल! ‘महावितरण’ने उभारले २ चार्जिंग स्टेशन; ११.१२ रुपये प्रतियुनिट दर

Solapur News: सोलापुरात ३००० ई-व्हेईकल! ‘महावितरण’ने उभारले २ चार्जिंग स्टेशन; ११.१२ रुपये प्रतियुनिट दर

Solapur News : ई-व्हेईकलची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सोलापूर शहरात दोन हजार १०२ तर ग्रामीणमध्ये ८०३ इलेक्ट्रिक व्हेईकल रस्त्यावर धावत आहेत. त्याची नोंदणी ‘आरटीओ’कडे झाली आहे.

पण, त्या वाहनांच्या शास्त्रोक्त चार्जिंगसाठी सोलापूर जिल्ह्यात व्यवस्थाच नाही. ही गरज ओळखून ‘महावितरण’ने सोलापूर शहरातील जुळे सोलापूर व अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे चार्जिंग स्टेशन उभारले असून एप्रिलमध्ये त्याचा प्रारंभ होणार आहे.

हवा प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करीत केंद्र सरकारने नवीन धोरण आणले आहे. १५ वर्षांवरील शासकीय वाहने आता ३१ मार्चपूर्वी भंगारात काढली जाणार आहेत.

तर खासगी वाहनांना २० वर्षांची मुदत असणार आहे, पण त्यासंबंधीचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. तत्पूर्वी, इंधनासाठी परकीय देशावर अवलंबून राहावे लागते आणि वाहनांच्या अमर्याद संख्येमुळे इंधनाचा खपदेखील भरमसाट वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ई-व्हेईकलला प्रोत्साहन दिले आहे. त्यानुसार, ताशी २५ कि.मी.पेक्षा कमी वेग असलेल्या वाहनांची नोंदणी ‘आरटीओ’कडे करण्याची गरजच नाही.

ताशी २५ कि.मी.पेक्षा अधिक वेग असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी मात्र बंधनकारक आहे. त्याअंतर्गत सोलापूर शहरात दोन हजार १०० दुचाकी, ७० तीनचाकी आणि ४६ चारचाकी आहेत.

तर ग्रामीणमध्ये ७८९ इलेक्ट्रिक दुचाकी आणि १४ चारचाकी आहेत. ‘महावितरण’ने उभारलेल्या चार्जिंग स्टेशनवर पहिल्यांदा चारचाकी वाहनांची सोय असणार आहे. आणखी दोन चार्जिंग स्टेशन सोलापूरसाठी मंजूर असून त्याठिकाणी दुचाकी व तीनचाकीची सोय केली जाणार आहे.

जिल्ह्यातील ई-व्हेईकलची स्थिती

 • दुचाकी

 • २,८८९

 • तीनचाकी

 • ७२

 • चारचाकी

 • ६०

 • एकूण

 • ३,०२१

एप्रिलमध्ये दोन्ही चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी ‘महावितरण’तर्फे जुळे सोलापूर व एमआयडीसी येथील आमच्या सबस्टेशन परिसरातच दोन चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत. पुढील महिन्यात त्याचा शुभारंभ होईल. पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहनांची सोय त्याठिकाणी केली असून एकावेळीच तीन गाड्यांचे चार्जिंग होईल, अशी व्यवस्था त्याठिकाणी असेल.

- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

चार्जिंग स्टेशनसंदर्भातील ठळक बाबी...

 • एकावेळी तीन वाहनांचे होऊ शकते चार्जिंग

 • अर्ध्या तासात वाहनाचे चार्जिंग पूर्ण होण्याची व्यवस्था

 • प्रतियुनिट साधारणतः: ११.१२ रुपयांचा खर्च; सर्व्हिस चार्ज तीन रुपये

 • युनिटप्रमाणे ऑनलाइनच पैसे भरावे लागणार; त्यानंतरच वाहन पुढे नेता येते