राज्यात यंदा ३३ कोटी वृक्ष लावणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे - राज्यात यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमांद्वारे सामाजिक, आर्थिक, रोजगारनिर्मिती आणि भावनिक बंध असे कंगोरे जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिली.

पुणे - राज्यात यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमांद्वारे सामाजिक, आर्थिक, रोजगारनिर्मिती आणि भावनिक बंध असे कंगोरे जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिली.

खारगे म्हणाले, ‘‘या वर्षी वृक्ष लागवड मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत राबवायची आहे. त्यानंतर किंवा त्याआधी लावलेल्या वृक्षांची नोंद उद्दिष्टांमध्ये घेण्यात येईल. कन्या वनसमृद्धी योजनेद्वारे मुलीच्या जन्मानंतर शेतकऱ्याला पाच सागाची आणि पाच फळझाडांची रोपे भेट म्हणून देण्यात येत आहेत. वृक्ष लागवड कार्यक्रमांमध्ये ‘ग्रीन आर्मी’ सदस्यांचाही सहभाग घेण्यात येईल. 

बांबू, चिंच, तुतीच्या वृक्ष लागवडीने शेती उत्पादनात वाढ होते आणि रोजगारही उपलब्ध होतो. यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्यात येईल. 
याबाबत विधानभवन येथील सभागृहात नुकत्याच झालेल्या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एस. एच. पाटील, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, पुणे येथील मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्‍लेमेंट बेन, वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जे. पी. त्रिपाठी, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे उपस्थित होते.

पुणे विभागाला ५.४७ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट  
पुणे विभागाला ५ कोटी ४७ लाख ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट निश्‍चितपणे पूर्ण करू, असा विश्‍वास विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केला. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्याला १ कोटी ५२ लाख ३८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ते निश्‍चितपणे पूर्ण करण्यात येईल.’’

Web Title: 33 Crore Tree Plantation in State Vikas Kharage