गावागावांत 365 दिवस पाणी देऊ - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

'स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, तुरुंगवास व त्यांनी सहन केलेल्या अनन्वित अत्याचारांतून मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. आपल्याला यापुढे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीडसारखी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावागावांत 365 दिवस स्वच्छ पाणी देऊ,' असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

औरंगाबाद - 'स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, तुरुंगवास व त्यांनी सहन केलेल्या अनन्वित अत्याचारांतून मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. आपल्याला यापुढे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीडसारखी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावागावांत 365 दिवस स्वच्छ पाणी देऊ,' असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे मुख्य शासकीय ध्वजवंदन मंगळवारी सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. यानंतर ते बोलत होते. या वेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे आदींची उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, 'मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि नुकतेच जम्मू-काश्‍मीरमधील हटविलेले 370 वे कलम यातून स्वातंत्र्याची अनुभूती येते. मराठवाड्याच्या विकासाला अधिक चालना देण्याचे काम मागील पाच वर्षांपासून शासन करीत आहे. सिंचन, रस्ते, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास शासन प्रयत्न करीत आहे. आता शासनाने मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी संकल्प केलेला आहे.

दुष्काळमुक्तीसाठी मराठवाड्यातील धरणे लूप पद्धतीने जोडून 64 हजार किलोमीटरच्या पाइपलाइनच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणी पोचविणार आहे. त्याचबरोबर औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनाने 1,650 कोटी रुपयांच्या योजनेला नुकतीच मंजुरी दिली. यामुळे आगामी 50 वर्षांत औरंगाबादला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.'' सुरवातीला स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 365 days water in any village devendra fadnavis