आषाढीसाठी एसटीच्या 3,781 जादा बस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मुंबई - पंढरपूर येथे 23 जुलै रोजी भरणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एस. टी. महामंडळ सज्ज झाले आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्याच्या विविध भागांतून 3 हजार 781 जादा बस सोडण्यात येणार आहेत.

मुंबई - पंढरपूर येथे 23 जुलै रोजी भरणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एस. टी. महामंडळ सज्ज झाले आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्याच्या विविध भागांतून 3 हजार 781 जादा बस सोडण्यात येणार आहेत.

पंढरपूरहून परतीच्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता जादा बसपैकी 10 टक्के गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षण करावे. त्याचबरोबर msrtc reservation mobile app चा वापर करावा. पंढरपूरमध्ये ज्या ठिकाणी वारकऱ्यांचा निवास असतो, तेथे यंदा प्रथमच एसटीचे कर्मचारी स्वतः जाऊन प्रवाशांना तिकीट आरक्षण करून देणार आहेत. या सुविधेचा लाभ भाविक-प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे. यात्राकाळात 21 जुलै ते 28 जुलै दरम्यान एसटीचे 8 हजार कर्मचारी तैनात केले जातील.

रिंगण सोहळ्यासाठी सोय
21 जुलै (शनिवार) रोजी बाजीराव विहिर येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याला जाण्यासाठी पंढरपूरहून 100 जादा बसची सोय केली आहे. या बस दिवसभर ये-जा करतील. पंढरपूरहून सात किलोमीटरवरील विठ्ठल सहकारी साखर कारखाना बसस्थानकावर जाण्यासाठीही जादा बस सोडण्यात येतील.

तीन तात्पुरती स्थानके
- पंढरपूर येथे तीन तात्पुरती बसस्थानके
- मराठवाड्यांच्या प्रवाशांसाठी भीमा स्थानक
- पुणे-मुंबईसाठी चंद्रभागानगर स्थानक
- जळगाव-नाशिकच्या प्रवाशांसाठी पंढरपूरजवळील विठ्ठल सहकारी साखर कारखाना बसस्थानक
- या तिन्ही स्थानकांवर पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष, संगणकीय उद्‌घोषणा आदी सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे असतील

Web Title: 3781 extra bus for Ashadhi Ekadashi