शेतकऱ्यांचे नुकसान 4 लाखांचे अन् मदत 40 हजारांची!

संतोष विंचू
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मागील वर्षी विक्रमी बाजारभाव मिळाल्याने यंदा अल्प पाऊस असूनही मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली होती. त्यामुळे उत्पन्नही अधिक निघाले. पण बाजारभाव कोसळल्याने प्रत्येक शेतकऱ्याला लाखोंचा भुर्डंद बसला. 200 रूपये अनुदान तुटपुंजे असून, त्यात 200 क्विंटलची मर्यादा घातल्याने 40 हजारांपेक्षा अधिक मदत कुणालाही मिळणार नाही. शासनाने अनुदान 500 रुपये करावी व 200 क्विंटलची अट रद्द करावी.

- उषा शिंदे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला

येवला : भाव पडल्याने अखेर कांदा उत्पादकांना मदतीचा हात म्हणून प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान सरकारकडून जाहीर करण्यात आले. मात्र, तालुक्यातील शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ही मदत काडीचा आधारही ठरणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पडलेल्या भावामुळे चार-पाच लाखांचे नुकसान होऊनही मिळणारी मदत 40 हजारांपर्यंतची असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

पाणीटंचाईमुळे तालुक्यात उन्हाळ कांद्याची पीक अशक्य असल्याने शेतकरी पावसाच्या भरवशावर खरिपातील लाल व रब्बीतील रांगडा कांद्याची विक्रमी क्षेत्रावर लागवड करतात. यंदा लाल-रांगडा मिळून तालुक्यात सुमारे १८ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड पाऊस नसतानाही झालेली होती. शेतकऱ्यांनी ठिबकसह टँकरद्वारे पाणी देऊन कांदे जगवले व पिकवले पण बाजारात आणल्यावर त्याला कवडीमोल भाव मिळाल्याने ८०० ते १००० क्विंटल व त्यापेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.

दुष्काळ आणि त्यामध्ये भाव कमी त्यामुळे शासनाने पाचशे रुपयांप्रमाणे प्रतिक्विंटलला अनुदान देण्याची मागणी व अपेक्षा होती. प्रत्यक्षात दोनशे रुपयांचीच घोषणा झाल्याने शेतकर्‍यांची एकप्रकारे चेष्टाच सुरू असल्याचे यातून दिसत आहे. यातही प्रतिशेतकरी २०० हेक्टर पर्यंतची मदत दिली जाणार असल्याने यापेक्षा अधिक पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपासून वंचित राहण्याची वेळ सरकारने आणली आहे. नुकसान चार लाखांची अन् मदत चाळीस हजार अशी वेळ अनेकांवर या निकषांमुळे आली आहे.

या मदतीसाठी घातलेल्या बंधनानुसार १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत १५ हजार शेतकऱ्यांनी येथील बाजार समितीत कांदा विकला असून सरासरी विचार करता ४ कोटी ६१ लाखांची मदत त्यांच्या खात्यावर मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात ही मदत मिळेल तेव्हाच घोषणा खरी म्हणावी.

येवल्यातील कांदा विक्रीचे आकडे बोलतात...

*१ ते ३० नोव्हेंबरला विक्री - १ लाख १४ हजार क्विंटल
*१ ते १५ डिसेंबरला विक्री - १ लाख १६ हजार क्विंटल
*एकूण कांदा विक्री - २ लाख ३० हजार क्विंटल
*विक्री केलेले शेतकरी - १५ हजार ३००
*मिळू शकणारे अनुदान - ४ कोटी ६१ लाख

Web Title: 4 lakhs of loss of farmers and 40 thousand rupees financial helps