महाप्रकल्पांनी विकासाचे चाक गतिमान

महाप्रकल्पांनी विकासाचे चाक गतिमान

पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सातारा, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती इत्यादी शहरांत सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे. शहरे परस्परांना जोडण्यासाठीचे रस्ते अपुरे पडू लागल्यामुळे चार पदरी-सहापदरी रस्त्यांची मागणी वाढत आहे. पुणे आणि मुंबई शहरात तर वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने सार्वजनिक वाहतुकीचे मेट्रो, मोनोरेल, बीआरटी इत्यादी प्रकल्प राबवले जाताहेत. रस्त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन यापुढे जलवाहतुकीच्या प्रकल्पांवरही भर दिला जात आहे. नितीन गडकरी यांच्या धडाक्‍याने मोठे प्रकल्प मार्गी लागत आहेत. 

मुंबईतील महत्त्वाकांक्षी वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम सुरू आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर ते कुसगावदरम्यान पर्यायी बोगद्याचे कामही मंजूर झालंय. सायन-पनवेलदरम्यान वाशीच्या खाडीवर नव्या पुलाचेही काम सुरू होत आहे. पुण्यात ३१, तर नागपूरमध्ये ४२ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पांनी वेग घेतलाय. दोन-तीन वर्षांत ते पूर्ण होतील. मुंबई-नागपूरदरम्यानच्या ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या शहरांना फायदा होणार आहे. ‘समृद्धी’साठी नागपूर-ठाणेदरम्यान भूसंपादनाचे काम ९० टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले. दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ८ लेनचा रस्ता असून, तो १२० मीटर रुंद असेल. 

पालखी मार्गांचा विकास 
२०१४ पर्यंत राष्ट्रीय महामार्गांची राज्यातील लांबी ५७०० किलोमीटर होती, आता ती १६ हजार ७३६ किलोमीटर झाली आहे. म्हणजेच, आता राज्यात २२ हजार ४३६ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले आहेत. तर, ४ हजार ६८७ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जाहीर झालेत. त्याबरोबरच संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग (२७० कि.मी.), संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (१४६ कि. मी.), साईबाबा पालखी मार्ग (५१ कि. मी.), संत गजानन महाराज पालखी मार्ग (१८० कि. मी.), गुरुद्वारा मार्ग (१४० कि.मी.) यांचेही काम सुरू झाले आहे. भारतमाला योजनेंतर्गत मुंबई-कोलकत्ता,  मुंबई-कन्याकुमारी, मुंबई-आग्रा, पुणे-विजयवाडा, नागपूर-सुरत, नागपूर-सोलापूर, नागपूर-इंदूर, सोलापूर-बळ्ळारी, औरंगाबाद-हैदराबाद, सोलापूर-मेहबबूनगर, पुणे-औरंगबाद अशा ८ हजार ३३६ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांनाही सुरवात झाली आहे. तर, दिघी, दाभोळ, गुहागर, जयगड, देवगड, मालवण, वेंगुर्ला येथील सागरी ४४५ किलोमीटरच्या रस्त्यांच्याही कामाने वेग घेतलाय. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून चार वर्षांत १९०० किलोमीटरच्या रस्त्यांची कामे सुरू झालीत. पुणे, धुळे, सोलापूर आणि नागपूर या शहरांमध्ये रिंग रस्त्याचीही कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात पाण्याच्या, तर शहरी भागात वाहतुकीच्या बहुविध प्रकल्पांवर भर दिला आहे. त्यातून ‘मोबिलीटी’ सक्षम होईल अन्‌ नागरिकरण सुलभ होईल.


दळणवळण हा विकासाचा मंत्र असून, त्याद्वारे देशात विकास होत आहे. महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षांत झाली नाहीत इतकी रस्त्यांची कामे गेल्या चार वर्षांत सुरू झाली आहेत. हा वेग कायम राहणार असून, पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील रस्त्यांचा संपूर्ण प्रश्‍न सुटणार आहे. मुंबई-दिल्ली हा नवा द्रुतगती मार्ग बांधण्याचे काम सुरू होत आहे. अडीच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सागरी रस्ते आणि बंदर विकासाच्या बाबतही आपण पुढे आहोत. 
- नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com