रेल्वेच्या 40 हजार डब्यांना नवा साज - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या 40 हजार डब्यांची रचना बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

मुंबई - प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या 40 हजार डब्यांची रचना बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ते करमाळी तेजस सुपरफास्ट गाडीला प्रभू यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या 13 स्थानकांवरील सेवा- सुविधांचे उद्‌घाटनही त्यांनी केले.

कोहिनूर हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या बाह्यरचनेबरोबरच अंतर्गत सजावटीत बदल करण्यात येणार आहेत. येत्या पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. डब्यात आगप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती प्रभू यांनी दिली.

अपघातात जीवितहानी होऊ नये, यासाठी डब्यांची बांधणी एलएचबी प्रकारची करण्यात येणार आहे. त्यांच्या बाहेरील बांधणीत स्टील, तर आतील बांधणीसाठी ऍल्युमिनियमचा वापर करण्यात येतो. सध्या राजधानी, शताब्दी, दुरान्तो, अंत्योदय, हमसफर या गाड्यांच्या डब्यांची बांधणी एलएचबी प्रकारातील आहे, असेही प्रभू यांनी सांगितले.

सीएसटी, कुर्ला, दादर, घाटकोपर, वडाळा, डॉकयार्ड रोड, चेंबूर, रे रोड, कॉटन ग्रीन, मानखुर्द, ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण स्थानकांतील हाय वॉक, सरकते जिने, लिफ्ट, पादचारी पूल, तिकीट घर, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष या सेवा-सुविधांचेही उद्‌घाटन प्रभू यांनी केले. या वेळी खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, गोपाळ शेट्‌टी, किरीट सोमय्या, श्रीकांत शिंदे, हुसेन दलवाई, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल, एमआरव्हीसीचे अध्यक्ष प्रभात सहाय आदी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी तेजस लेट
सीएसटी ते करमाळी तेजस एक्‍स्प्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सायंकाळी 4.05 मिनिटांनी दादर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी सीएसटीहून 3.25 वाजता सुटणार होती; परंतु प्रभू यांना दादर येथील कार्यक्रमाला पोचण्यास उशीर झाला, त्यामुळे तेजसला उशीर झाला.

डबल डेकर बंद करू नका
लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणारी एसी डबल डेकर गाडी बंद करू नका. ती सुरू ठेवणार की नाही ते स्पष्ट करा, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर केली. तेजसला कणकवलीला थांबा देण्याची मागणी त्यांनी केल्यानंतर खासदार हुसेन दलवाई यांनी तेजसला चिपळूणमध्येही थांबा द्यावा अशी मागणी केली.

प्रभू काय म्हणाले?
- ई कॅटरिंगमध्ये आमूलाग्र बदल करणार. आधुनिक किचनचा समावेश करणार
- रेल्वे स्थानकांतील खाद्यपदार्थांचे स्टॉल चालवण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य
- आयआरसीटीसीच्या वेबसाइटमध्ये बदल करणार
- रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त निधी उभा करणार
- दोन वर्षांत विद्युतीकरण पूर्ण करणार

Web Title: 40000 new look for railway coach