581 डॉक्‍टरांचा सरकारी सेवेला राम राम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागांतील सुमारे 581 डॉक्‍टरांनी सरकारी वैद्यकीय सेवा सोडल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली. या फरारी डॉक्‍टरांपैकी 104 जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल कौन्सिलकडे केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

राज्यातले उच्चशिक्षित शेकडो डॉक्‍टर सरकारी सेवेत काम करण्यास इच्छुक नाहीत. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण पूर्ण होतेवेळी डॉक्‍टरांना बॉण्ड बंधनकारक करण्यात आला आहे. तरीही हा कालावधी पूर्ण होण्याआधी किंवा सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर कोणतेही कारण न देता सेवा सोडून जाणे, आपल्या पदाचा राजीनामा न देणे व सरकारची परवानगी न घेता वैयक्तिक व्यवसाय करणे अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारने फरारी घोषित केले आहे. 

कोणताही पत्रव्यवहार न करता सेवा सोडून गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी आवश्‍यक असते. परवानगीनंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येते. त्यानुसार अद्याप 477 अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. सेवा सोडून गेल्यानंतर अशा रिक्त जागांवर सरकारकडून त्वरित कायमस्वरूपी पद भरणे शक्‍य नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात पदे भरली जातात. त्यामुळे सेवेवर तितकासा परिणाम होत नाही. पुढच्या तीन महिन्यांत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी एमएस, एमडी अर्हतेची 545 पदे भरण्यात येणार आहेत. 

ट्राम सर्व्हिस आणि अन्य वैद्यकीय सेवेत एक हजार 332 पदे भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर क व ड वर्गाची तीन हजार 187 पदे काही दिवसांत भरण्यात येणार असून, ही प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही सावंत यांनी दिली.

Web Title: 581 doctors leave government service