Vidhan Sabha 2019 : राज्यभरात एकूण 60.46 टक्के मतदान

60.46% total Voting in Maharashtra Vidhansabha Election
60.46% total Voting in Maharashtra Vidhansabha Election

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.  

राज्यातील विधानसभा मतदानाची आकडेवारी सांगताना श्री. सिंह म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही. 

राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले.

जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे
अहमदनगर 64.93 टक्के, अकोला 56.88 टक्के, अमरावती 59.33, औरंगाबाद 65.06, बीड 68.03, भंडारा 66.35, बुलढाणा 64.41, चंद्रपूर 63.42, धुळे 61.90, गडचिरोली 68.59, गोंदिया 64.06, हिंगोली 68.67, जळगाव 58.60, जालना 67.09, कोल्हापूर 73.62, लातूर 61.77, मुंबई शहर 48.63, मुंबई उपनगर 51.17, नागपूर 57.44, नांदेड 65.40, नंदुरबार 65.50, नाशिक 59.44, पालघर 59.32, परभणी 67.41, पुणे 57.74, रायगड 65.90, रत्नागिरी 58.59, सांगली 66.63, सातारा 66.60, सिंधुदुर्ग 64.57, सोलापूर 64.23, ठाणे 47.91, उस्मानाबाद 62.21, वर्धा 62.17, वाशिम 61.33 आणि यवतमाळ जिल्ह्यात 63.09 टक्के मतदान झाले.

इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी प्रत्यक्ष वापरात 1 लाख 12 हजार 328 बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी 96 हजार 661 इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव 24 हजार 625 बीयु, 21 हजार 277 सीयु आणि 28 हजार 992 व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आज प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात 3 हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (522 बीयु, 949 सीयु आणि 1 हजार 974 व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यात 4 हजार 69 इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये 665 बीयु (0.59%), 596 सीयु (0.62%) आणि 3 हजार 437 व्हीव्हीपॅट (3.56%) नादुरुस्त झाल्या.

प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली इव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात / बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.

इव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 152, शिवसेना 89 व इतर 120 अशा एकूण 361 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीसाठी त्वरीत पाठविण्यात आलेल्या आहेत.

मतदानाची वैशिष्ट्ये :-
महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-
⦁ पुणे जिल्ह्यातील 215-कसबापेठ मतदारसंघामध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून प्रथमच ‘बार कोडींग’चा वापर करण्यात आला.
⦁ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी एकूण 5 हजार 435 इतकी मतदान केंद्रे वरच्या मजल्यावरुन तळ मजल्यावर स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.
⦁ अतिवृष्टी झाल्यामुळे 259-कराड उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 31 या केंद्राचे स्थलांतर मतदानाच्या आदल्यादिवशी करण्यात आले.
⦁ काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस झाला. उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पोलिंग पार्टीच्या दळणवळणामध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र पोलिंग पार्टी वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि मतदान सुरळीतपणे पार पाडण्यात आले. 
⦁ रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णालयातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
⦁ विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीजनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले.
⦁ शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही, मतदानाचे प्रमाण चांगले राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com