मनसेमुळेच 65 टोलनाके बंद : ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

ठाकरे पुढे म्हणाल्या की, एक्स्प्रेसवेवरील टोल वसुलीच्या कराराची मुदत संपलेली आहे ना? मग त्याच रस्त्यासाठी पुन्हा नव्याने टोलवसुलीचा करार करण्याचा निर्णय का घेतला जातोय? यामागे नेमके कोणाचे आर्थिक लागेबांधे आहेत? उद्या लोकांनीच टोल भरण्यास नकार दिला तर काय करणार? आज जनता सरकारला फक्त सवाल विचारतेय...उद्या जनता 'मुंहतोड जवाब' देईल!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक आंदोलनामुळेच राज्यातील तब्बल 65 टोलनाके बंद झाल्याचा दावा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला.

शालिनी ठाकरे म्हणाल्या की, राज्यातील 'टोलच्या झोल'विरोधात सर्वात पहिल्यांदा मनसेने आवाज उठवला.  राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, शेकडो महाराष्ट्र सैनिकांनी ठिकठिकाणी टोल नाक्यांचे सर्व्हेक्षण केले. मनसेच्या आक्रमक आंदोलनांमुळेच राज्यातील जवळपास ६५ टोल नाके बंद करण्यात आले. उर्वरित टोल नाक्यांविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. 

कालच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लिमिटेड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (msrdc) एका ई-टेंडरसंबंधीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हे टेंडर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील दोन ठिकाणी टोल वसुलीच्या कंत्राटासाठी काढण्यात आले आहे.  आयआरबी कंपनीला टोल वसूल करण्याचे काम 15 वर्षांसाठी देण्यात आले होते, त्या कराराची मुदत आॅगस्ट 2019 मध्ये संपत आहे. रस्ता निर्मितीसाठी आलेला खर्च केव्हाच वसूल झाला असून या टोल वसुलीच्या कंत्राटातून आयआरबीला भरमसाठ नफाही झालेला आहे. 

"आम्ही सत्तेवर आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू" असे आश्वासन भाजपने निवडणुकीपूर्वी दिले होते. हे आश्वासन भाजपवाले विसरले असले तरी सर्वसामान्य जनता विसरलेली नाही. 

ठाकरे पुढे म्हणाल्या की, एक्स्प्रेसवेवरील टोल वसुलीच्या कराराची मुदत संपलेली आहे ना? मग त्याच रस्त्यासाठी पुन्हा नव्याने टोलवसुलीचा करार करण्याचा निर्णय का घेतला जातोय? यामागे नेमके कोणाचे आर्थिक लागेबांधे आहेत? उद्या लोकांनीच टोल भरण्यास नकार दिला तर काय करणार? आज जनता सरकारला फक्त सवाल विचारतेय...उद्या जनता 'मुंहतोड जवाब' देईल!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 65 toll plaza closed because of MNS says Shalini Thackeray