मोबाईल, टिव्हीमुळे १०० मुलांमागे ७ जणांना दृष्टीदोष! डोळ्याची अशी घ्या काळजी, मुलांची समस्या होईल दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eye donation
मोबाईल, टिव्हीमुळे १०० मुलांमागे ७ जणांना दृष्टीदोष! डोळ्याची अशी घ्या काळजी, मुलांची समस्या होईल दूर

मोबाईल, टिव्हीमुळे १०० मुलांमागे ७ जणांना दृष्टीदोष! डोळ्याची अशी घ्या काळजी, मुलांची समस्या होईल दूर

सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता एका व्यक्तीने दृष्टिदान केल्यास दोघांना जग पाहण्याची संधी मिळू शकते. सद्य:स्थितीत तीन कोटी ३० लाख लोकांना दृष्टीची गरज आहे. त्यातील तीन कोटी व्यक्तींना ‘कॉर्निया’ बसविण्याची गरज आहे, पण तेवढ्या प्रमाणात दृष्टिदान होत नसल्याने अनेकांना अंधकारमय जीवन जगावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

कोरोना काळात सहा ते १८ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष वाढला आहे. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप अशा स्क्रिनचा अतिवापर झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थ्यांमध्ये तब्बल सात हजारांहून अधिक मुलांमध्ये दृष्टिदोष आढळला आहे. त्यांना शासनातर्फे चष्मे वाटप करण्यात आले आहे. विलंबाने चष्मे दिल्यास त्यांची नजर अंधूक होऊन अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

शेतात काम करताना, अपघातात डोळ्याला काहीतरी लागल्यास त्याकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टी कमी होते. अशा लोकांनाही दृष्टीची गरज लागते. डोळा पूर्णपणे बसवता येत नाही, डोळ्याचा समोरील पडदा बदलता येतो. लेन्स देखील बदलता येते, पण रेटिना चांगला असायला हवा. सोलापूर जिल्ह्यातील सरासरी १५० व्यक्तींना दरवर्षी डोळ्यांची आवश्यकता आहे, पण प्रत्यक्षात दरवर्षी ३५ ते ४० लोकच दृष्टिदान करतात. सोलापूर जिल्ह्यात चार आय बॅंका असून तीन नेत्र संकलन केंद्रे तर दोन नेत्र रोपण केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून दृष्टिदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे.

शंभर मुलांमागे सात जणांना दृष्टिदोष

कोरोना काळात मुलांचे शिक्षण, परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच पार पडल्या. त्यावेळी मोबाईल, टॅब, लॅपटॉपचा अतिवापर झाला. निर्बंध आणि त्यातच शाळा बंद असल्याने टीव्ही देखील पाहण्याकडे मुलांचा कल होता. बहुतेक मुलांची आता ती सवय झाली असून त्यातूनच धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ६ ते १८ वयोगटातील प्रत्येक १०० मुलांमागे सात जणांमध्ये दृष्टिदोष आढळत आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोतिबिंदुसह डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत.

दृष्टिदानासाठी वयाची मर्यादा लागत नाही

दृष्टिदान चळवळ अधिक गतिमान होणे आवश्यक आहे. दृष्टिदानासाठी वयाची मर्यादा लागत नाही. सोलापूर जिल्ह्यात दोन महिन्याच्या बाळापासून ९९ वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीने देखील दृष्टिदान केले आहे. कोरोनानंतर दृष्टिदोषाचे रुग्ण वाढले असून दृष्टिदान करणारे पण कमी झाल्याची स्थिती आहे.

- डॉ. गणेश इंदूरकर, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, सोलापूर

डोळ्यांची अशी घ्या काळजी...

  • - मोबाईल, टीव्हीसह अन्य स्क्रिनचा अतिवापर टाळावा.

  • - आहारात हिरव्या पालेभाज्या, गाजर, आंबा व पिवळी फळे असावी.

  • - बाहेर जाताना डोळ्यावर चष्मा किंवा डोक्यावर हेल्मेट असावे.

  • - दररोज पाच मिनिटे थंड पाण्याची पट्टी डोळ्यावर ठेवा, सकाळी दोन्ही हात चोळून डोळ्यांना लावा.

  • - कॅन्डल लावून तिच्या ज्योतीकडे एक-दोन मिनिटे एकटक पाहा, एकाग्रता वाढेल अन्‌ तिरळेपणा कमी होईल.