अबब! 729 जागांसाठी सव्वातीन लाख उमेदवार

तात्या लांडगे
रविवार, 1 डिसेंबर 2019

- पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधन पर्यवेक्षक व परिचरची भरती 

सोलापूऱ : राज्य सरकारच्या 72 हजारांच्या शासकीय रिक्‍त जागांच्या महाभरतीच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधन पर्यवेक्षक व परिचर अशा 729 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. त्यासाठी तब्बल तीन लाख 29 हजार 689 उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती महापरीक्षा कक्षाने दिली. 

अर्जदारांची संख्या मोठी असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या जागांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याचे नियोजन महापरीक्षा कक्षाचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली केल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने 149 पशुधन पर्यवेक्षक व 580 परिचर जागांची भरती प्रक्रिया राबविली. त्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागातून तब्बल तीन लाख 30 हजार उमेदवारांनी अर्ज केले.

तत्पूर्वी, शिक्षण, आरोग्य, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र, पशुसंवर्धन, पोलिस, महसूल, नगरपालिकांसह अन्य शासकीय विभागांमधील 72 हजार रिक्‍त जागांच्या भरतीचे नियोजन महापरीक्षा कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

पुणे, नाशिक, औरंगाबादमधून सर्वाधिक अर्ज 

पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचरच्या 729 जागांसाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. पुणे विभागातून सुमारे 70 हजार, तर नाशिक व औरंगाबाद विभागातून दीड लाख उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. लातूर, अमरावती, नागपूर, मुंबई विभागातून सुमारे एक लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्जदारांमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे. 

परिचरांच्या विभागनिहाय जागा 
143 
पुणे 

67 
मुंबई 

93 
नाशिक 

87 
औरंगाबाद 

22 
लातूर 

69 
अमरावती 

99 
नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For 729 Post Applicant above 3 Lakhs