'महिलांच्या गटांना शेळ्या-मेंढ्यासाठी मिळणार 75 टक्के अनुदान'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

बंदिस्त शेळी-मेंढी पालन प्रकल्प सुरू करण्यासाठी भ. ज. क. प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना 75 टक्के अनुदान देण्याची योजना राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज दिले.

मुंबई : बंदिस्त शेळी-मेंढी पालन प्रकल्प सुरू करण्यासाठी भ. ज. क. प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना 75 टक्के अनुदान देण्याची योजना राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज दिले.

महिला बंदिस्त शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थांच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने श्री.जानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज तारापोरवाला मत्स्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यक्तिगत स्तरावर योजनेचा लाभ घेण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या धनगर व तत्सम समाजातील महिलांना दिलासा देण्यासाठी या योजनेची रचना करण्यात येत आहे, असे सांगून जानकर म्हणाले की, महिलांच्या नोंदणीकृत सहकारी संस्थांना 75 टक्के अनुदानावर शेळ्यांचे गट देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. उर्वरित रकमेसाठी व्याजाने रक्कम घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ ग्रामीण बँकेने पुढाकार घ्यावा, असे जानकर यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.

एका संस्थेत किमान 20 ते कमाल 30 महिला सदस्य असणे आवश्यक असून सदस्य संख्येच्या प्रमाणात प्रतिसदस्य 20 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 01 बोकड किंवा नर मेंढा वाटप केले जाणार  आहे. उर्वरित 25 टक्के रक्कम महिलांच्या संस्थेने उभी करावयाची आहे. या संस्था कोणत्याही कर्जाशिवाय स्वहिस्सा म्हणून ही रक्कम उभी करु शकतात किंवा 25 टक्केपैकी किमान 05 टक्के स्वहिस्सा आणि 20 टक्के बँकेचे कर्ज हा पर्याय दिला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 75% subsidy for goats for women in Dhangar community