नवीन 99 लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षेचा फायदा - बापट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई - राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत आता नवीन 99 लाख शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य घेता येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यात 44 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 56 लाख 63 हजार 282 आणि 59 हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या 36 लाख 73 हजार 32 याप्रमाणे एकूण 93 लाख 36 हजार 314 आणि अंत्योदय अन्न योजनेतील 1 व 2 सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा सुमारे 99 लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आता 30 सप्टेंबर 2016 ऐवजी 30 एप्रिल 2018 पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, 30 एप्रिल 2018 पर्यंत आधार सिडींग होऊन पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्याने हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्‍यक राहणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात 1 फेब्रुवारी 2014 पासून करण्यात येत आहे. त्याकरिता केंद्र शासनाने राज्य शासनास जनगणना 2011 नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामीण लोकसंख्येच्या 76.32 टक्के (4.70 कोटी) व शहरी लोकसंख्येच्या 45.34 टक्के (2.30 कोटी) याप्रमाणे राज्यासाठी एकूण 62.30 टक्के (7.00 कोटी) एवढा कोटा दिला आहे.

Web Title: 99 lakh Beneficiary advantage of food security girish bapat