औरंगाबादला मिळाली दोन मंत्रिपदे, शिवसेनेने दिली यांना संधी : वाचा...

माधव इतबारे
Monday, 30 December 2019

शिवसेनेत नवख्यांना संधी मिळाली हा मेसेज जाऊ नये म्हणून, तब्बल पाचवेळी आमदार राहिलेले पैठणचे संदीपान भुमरे यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भुमरे हे जुने शिवसैनिक आहेत. ग्रामीण भागातील चेहरा म्हणून, त्यांची ओळख आहे. 

औरंगाबाद : शिवसेनेला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून देणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या वाट्याला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात दोन मंत्रिपदे आली आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेले आमदार अब्दुल सत्तार आणि पाचव्यांदा आमदार झालेले पैठणचे संदीपान भुमरे यांना संधी मिळाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्याला तडा गेला आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला व त्याचा वचपा चारच महिन्यानंतरच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काढला. 

Image result for abdul sattar sillod

भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यात सहा जागा आल्या. त्यात शंभर टक्के यश मिळवीत सहाही मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळविला. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादला झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार शिवसेनेकडून अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे या दोन आमदारांची वर्णी लागली आहे. 

मोलमजुरी, हमाली ते मंत्री... सत्तार यांचा प्रवास

कॉंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता असा दावा सत्तार यांनी वारंवार केला. तसेच अल्पसंख्याक चेहरा आणि आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्तार यांची मंत्रिपदावर वर्णी लावण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

Image result for sandipan bhumare

शिवसेनेत नवख्यांना संधी मिळाली हा मेसेज जाऊ नये म्हणून, तब्बल पाचवेळी आमदार राहिलेले पैठणचे संदीपान भुमरे यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भुमरे हे जुने शिवसैनिक आहेत. ग्रामीण भागातील चेहरा म्हणून, त्यांची ओळख आहे. 

महापालिका निवडणुकांवर डोळा 

सत्तार शिवसेनेत आल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील एक मोठा तालुका शिवसेनेच्या ताब्यात आला. सिल्लोड तालुक्‍यात शिवसेनेची बांधणी नाही, संघटन नाही अशा सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील पंचायत समिती, नगरपालिका व इतर संस्था शिवसेनेकडे आल्या आहेत. शिवाय कॉंग्रेसमध्ये असताना सत्तार यांचा संपूर्ण जिल्हाभरात वावर आणि संपर्क होता. 

Image result for sandipan bhumare

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्तार यांनी शिवसेनेला केलेली मदत, आगामी महापालिका निवडणुकीत देखील सत्तार यांच्यामुळे शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. शिवाय अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीला शिवसेनेने संधी दिली असा संदेश देखील सत्तार यांना मंत्री केल्यामुळे जाऊ शकतो, त्यामुळे सत्तार यांची बाजू वरचढ ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abdul Sattar Sandipan Bhumre Takes Oath As A Cabinet Minister Of Maharashtra Aurangabad Breaking