मोलमजुरी, हमाली ते मंत्री.. अब्दुल सत्तार यांचा प्रवास 

माधव इतबारे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी धनुष्यबाणाचा प्रचार करून आमदारकी मिळवली आणि मंत्रिपदाचा दावा कायम ठेवण्यातही ते अग्रेसर होते आणि शेवटी मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

औरंगाबाद : सिल्लोड शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या अब्दुल सत्तार यांनी मोलमजुरी, हमाली करून शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान छोटासा सायकल दुकान व्यवसाय सुरू केला. 1984 साली सिल्लोड ग्रामपंचायतची निवडणूक लढवून जिंकली.

माजी मंत्री बाबूरावजी काळे, सहकार महर्षी बाळासाहेब पवार, शिक्षण व सहकार महर्षी माणिकरावजी पालोदकर यांच्यासोबत राजकारणामध्ये काम करण्याची व राजकारण शिकण्याची त्यांना संधी मिळाली. 

Image result for abdul sattar sillod

1994 साली सिल्लोड नगरपरिषदेची पहिली निवडणूक झाली. सिल्लोड नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष झाले. नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दांपत्यांनी नगराध्यक्ष म्हणून भूषविले आहे व आजही सत्ता त्यांच्याकडे असून नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी नफिसाबेगम अब्दुल सत्तार असून नगरपरिषदेच्या एकूण 29 सदस्यांपैकी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस नगरसेवक सभागृहात आहेत. 

विविध शिक्षण संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंक, हज कमिटी, रोजगार हमी योजना, पंचायत राज आदि शासकीय समित्यांसह विविध समित्यांवर काम करताना भागातील शेतकरी, शेतमजूर व व्यापाऱ्यांची मदत करण्याचे काम केले. शंकररावजी चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना कॉंग्रेस पक्षात नुसता प्रवेश दिला नाही तर 2001 साली स्थानिक स्वराज्य संथा मतदार संघातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवून दिली. 

Image result for abdul sattar sillod

विरोधकांवर मात करत ते विधानपरिषद सदस्य झाले. कॉंग्रेस पक्षाने अब्दुल सत्तार यांच्या कामाची पद्धत पाहून 2004 साली सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली मात्र स्वंपक्षातील अनेकजण विरोधात उभे राहिले व पक्षातील अनेकांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याने अब्दुल सत्तार यांचा निसटता 301 मतांनी पराभव झाला. 2007 मध्ये विधान परिषदेत त्यांचा पराभव झाला. 

Image result for abdul sattar sillod

2007 मध्ये विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार मैदानात उतरवून अब्दुल सत्तार यांना शह देण्याचे कामे केले. 2009 साली त्यांना पक्षाने सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली.

याच दरम्यान एकाकाळाचे त्यांचे राजकीय नेतृत्व असलेले परंतु काही कारणास्तव 1996 ते 2008 पर्यंत दूर गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या सोबत त्यांचे राजकीय सूत जुळले व त्यांच्या मदतीने अब्दुल सत्तार यांनी विधानसभेची निवडणूक मोठ्या फरकाने जवळपास 30 हजार मताधिक्‍याने जिंकली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना कॅबिनेट मंत्री पद देऊन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायाचे खाते दिले.

Image result for abdul sattar sillod

शेवटपर्यंत मंत्रिपदाचा दावा कायम 

2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे सुरेश बनकर यांचा पराभव करून ते 15 हजार मतांनी निवडून आले. 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी धनुष्यबाणाचा प्रचार करून आमदारकी मिळवली आणि मंत्रिपदाचा दावा कायम ठेवण्यातही ते अग्रेसर होते आणि शेवटी मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abdul Sattar Takes Oath As A Minister of State Of Maharashtra Aurangabad Breaking