सोलापूर महापालिकेची पाणीचोरांसाठी अभय योजना 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 24 जून 2018

सोलापूर : अनधिकृत नळजोड घेऊन पाणी चोरणाऱ्यांसाठी महापालिकेने 15 ऑगस्टपर्यंत अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. "दहा हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळजोड नियमित करून घ्या,' असे या योजनेचे स्वरूप असणार आहे. 

सोलापूर : अनधिकृत नळजोड घेऊन पाणी चोरणाऱ्यांसाठी महापालिकेने 15 ऑगस्टपर्यंत अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. "दहा हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळजोड नियमित करून घ्या,' असे या योजनेचे स्वरूप असणार आहे. 
सोलापूर शहरात हजारोंच्या संख्येने अनधिकृत नळजोड असल्याचा आरोप वारंवार केला जातो. त्यात तथ्यही असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी पाणीचोरांविरुद्ध मोहीम राबविली. त्यांनी पहिला हातोडा उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीतून पाणी चोरणाऱ्यांवर हाणला. धक्कादायक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात मान्यवर म्हणून वावरणारे माढा, मोहोळ परिसरातील अनेक प्रतिष्ठित पाणीचोर निघाले होते. या प्रकरणी काही जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, नंतर हा विषय तिथेच थांबला. 

जलवाहिनीवरील मोहीम संपल्यानंतर काळम पाटील यांनी शहरातील पाणीचोरांविरुद्ध मोहीम राबविली. 21 ते 30 ऑगस्ट 2015 या कालावधीत आठ विभागीय कार्यालयांतर्गत राबविलेल्या या मोहिमेत 465 पाणीचोर आढळले. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. शहरातही अनेक प्रतिष्ठितांनी यात आपले कर्तृत्व दाखवले होते. ही बाब अद्यापही न्यायप्रविष्ठ आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी सर्व्हेक्षण केल्यावर शहराच्या अनेक भागांत अजूनही अनधिकृत नळजोड असल्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर हे नळजोड नियमित करण्यासाठी 15 ऑगस्ट 2018 मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कोणतीही पोलिस कारवाई केली जाणार नाही. 

.... तर फौजदारी कारवाई 
सोलापुरात 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा अनधिकृत नळजोड शोध मोहीम राबवली जाणार आहे. या कालावधीत जे अनधिकृत नळजोडधारक आढळतील त्यांचे नळजोड त्वरित बंद करण्यात येतील, शिवाय त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. 
 

Web Title: Abhay Yojna for Water Supply of Solapur Municipal Corporation